रशियातील एका शाळेत भीषण गोळीबार झाला असून यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ज्या व्यक्तीने हा गोळीबार केला त्याने स्वतःवर ही गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय ‘PFI’च्या निशाण्यावर…)
मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील इझेव्हस्क शहरात सोमवारी एका शाळेत झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. हे विद्यार्थी शहरातील शाळा क्रमांक ८८ मध्ये शिकत होते. हल्ल्यानंतर बंदूकधाऱ्याने आत्महत्या केल्याचे रशियाच्या तपास समितीने सांगितले.
हल्लाखोराने ब्लॅक टॉप घातला होता व त्यावर नाझीचे चिन्ह होते. त्याच्या कपड्यावर कोणतेही ओळखपत्र नव्हते. या हल्लाखोराची सध्या ओळख पटवली जात आहे. तसेच हल्ल्यामागील कारणाचाही शोध घेतला जात आहे. या हल्ल्यात किमान २० जण जखमी झाले असल्याची माहिती रशियाच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिली आहे. शाळा रिकामी करण्यात आली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. हल्लाखोर नेमका कोण होता, त्याचा हेतू नेमका काय होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. इझेव्हस्कमध्ये साधारण ६ लाख ४० हजार लोक राहतात. हे मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे ९६० किमी अंतरावर मध्य रशियाच्या उरल पर्वत प्रदेशाच्या पश्चिमेस आहे.