मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती काही थांबता थांबेना. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले. इतकंच नाही तर अनेक स्थानिक नेत्यांनीही शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. पण आता बाळासाहेब ठाकरेंसोबत सावलीसारख्या असणा-या चंपासिंग यांनी देखील आता शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.
थापा यांचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सेवक म्हणून चंपासिंग थापा यांची ओळख आहे. बाळासाहेब हयात असताना थापा यांनी बाळासाहेबांना सावलीप्रमाणे साथ दिली. बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला त्यांच्या मागे थापा उभे असल्याचे आजवर आपण पाहिले आहे. त्याच थापांनी आता शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाला परवानगी देण्यात आल्यामुळे खरी शिवसेना आपलीच असल्याचे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण थापा यांच्या या प्रवेशामुळे पुन्हा हा वाद चर्चेत आला आहे.
थापा यांची प्रतिक्रिया
बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांवर शिंदे गटाची स्थापना झाल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. आता थापा यांनीही शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाची आपली एक विचारधारा असते, माझ्या मनाने मला शिंदे गटात येण्याचा कौल दिला म्हणून मी इथे आलो आहे, असे चंपासिंग थापा यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community