स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकण आणि कोकणमार्गे कोल्हापूरात संचार करणा-या वाघांच्या अस्तित्वावर अखेर वनविभागाने कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून मोहोर उमटवली आहे. दक्षिण कोकण आणि कोल्हापूरात वनविभाग आणि शास्त्रज्ञांना ८ वाघांचे दर्शन घडले आहे. त्यापैकी वाघाची एक जोडी आता दक्षिण कोकणातील मानवी हस्तक्षेपापासून दूर असलेल्या जंगलात कायमस्वरुपी ठाण मांडून बसल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदवले.
(हेही वाचा – ‘स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाडा; नाहीतर’… सर्वोच्च न्यायालयाचा नारायण राणेंना दणका)
कर्नाटक आणि गोवा राज्यांतून काही काळासाठी कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यात वाघ येतात. गुरांची शिकार होत असल्याने या भागांत वाघ दिसून येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते. वाघांची हालचाल टिपण्यासाठी कोल्हापूर वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट या वन्यप्राणीप्रेमी संस्थेने कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वाघांच्या हालचालींची माहिती घेतली. दोनवर्षांपूर्वी कोकण आणि कोल्हापूरात जाहीर झालेल्या संरक्षित क्षेत्रात हे ८ वाघ वावरताना शास्त्रज्ञांना दिसले.
२०१४ सालापासून वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट ही संस्था कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून कोकणातून येणा-जाणा-या वाघांच्या अस्तित्वाचा शोध घेत आहे. आठवर्षांपासून वाघाची एक जोडी कोकणात कायमस्वरुपी राहत असल्याची खुशखबर वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ गिरीश पंजाबी यांनी दिली. इतर सहा वाघांचे दर्शन सतत दिसून येत असले तरीही त्यांना स्थानिक वाघ म्हणणे घाईचे ठरेल. दरवर्षाला कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून कोकण आणि कोल्हापूर पट्ट्यांत किती वाघ स्थायिक झालेत याबाबतची खात्रीलायक माहिती मिळेल, असेही ते म्हणाले.
वनविभाग वाघांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जनावरांना तातडीने नुकसानभरपाई देत आहे ही बाब वाघांच्या संवर्धनाला हातभार लावण्यास मदत करत असल्याचे समाधानही पंजाबी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघ काही काळासाठी कोकण पट्ट्यांत येत आहेत. वाघीणींची संख्या कमी असल्याने वाघ या भागांत फार काळ थांबत नसल्याचेही पंजाबी म्हणाले.
कॅमेरा ट्रॅप सर्व्हेक्षणाबाबत
नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत दक्षिण कोकण आणि कोल्हापूरातील तब्बल २२ ठिकाणी प्रत्येकी एक कॅमेरा ट्रॅप बसवले गेले. काही ठिकाणी दोन महिने तर काही ठिकाणी सहा महिने वाघांच्या हालचालींवर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवले गेले.
Join Our WhatsApp Communityमार्च महिन्यात कोल्हापूरातील राधानगरीत आढळून आलेला वाघ आता अभयारण्याबाहेर ये-जा करु लागला आहे. या वाघाला स्थानिक म्हणता येणार नाही, अभयारण्यात वाघाचे अधूनमधून दर्शन होत असते. कोकण आणि कोल्हापूरात वाघांचा वावर असल्याची बाब निश्चितच आनंददायी आहे.- विशाल माळी, विभागीय वनाधिकारी, कोल्हापूर वनविभाग