मुंबई महापालिकेने आधार व्हेरिफाईड फेशियल हे हजेरीचे नवीन तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून नायर रुग्णालय आणि डि प्रशासकीय विभाग कार्यालयातील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महापालिकेच्या इतर २५ ठिकाणी ही हजेरी प्रणाली बसवली जाणार आहे. सध्या बसवण्यात आलेल्या या हजेरी प्रणालीमध्ये फेशियल आणि बायोमेट्रीक या दोन्ही पध्दतीचा अवलंब केला जात असल्याने यापूर्वी बसवण्यात आलेल्या ठिकाण तसेच काही नवीन ठिकाणी आधार व्हेरिफाईड फेशियलद्वारे हजेरी नोंदवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे पूर्णपणे फेशियलद्वारेच हजेरी नोंदवण्याचा प्रयोगामध्ये या प्रणालीचा सुरळीत वापर होत असल्याचे दिसून आल्यास महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये या प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचा विचार केला जाणार आहे.
आधार व्हेरिफाईड फेशियल हजेरीचे नवीन तंत्र
मुंबई महापालिकेच्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात आल्यानंतर यावर पर्याय म्हणून महापालिकेने आधार व्हेरिफाईड फेशियल हे हजेरीचे नवीन तंत्र अंमलात आणण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रारंभी नायर रुग्णालयात आणि त्यानंतर महापालिकेच्या डि विभाग कार्यालयांमध्ये या हजेरी प्रणालीबाबत नोदणीची प्रक्रिया राबवली. याच्या यशस्वी प्रयोगानंतर महापालिकेच्या कार्यालयांमध्ये याचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फेब्रुवारी २०२२मध्ये यावर निर्णय घेण्यात येणार होता. परंतु त्यावर प्रशासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारचा निर्णय न झाल्याने या हजेरी प्रणालीचा वापर केला जात नव्हता. परिणामी बायोमेट्रीक हजेरी प्रणालीतील तांत्रिक दोषामुळे प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जावे लागत होते. याबाबत हिंदुस्थान पोस्टनेही प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराकडे लक्ष वेधल्यानंतर प्रशासनाने तातडीने यावर निर्णय घेतला.
( हेही वाचा : राज्यात लवकरच २० हजार पदांसाठी पोलीस भरती; देवेंद्र फडणवीसांची घोषणा )
काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांच्यासोबत सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत आणि सामान्य प्रशासनातील अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या आधार व्हेरिफाईड फेशियल बायोमेट्रीक या तंत्राचा अवलंब करण्यासाठी यासाठीची यंत्रे बसवण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये अतिरिक्त आयुक्तांनी, ज्याठिकाणी या हजेरी प्रणालीचा वापर केला आहे, तिथे बायोमेट्रीक अधिक फेसियल या दोन्ही हजेरी प्रणालीचा वापर केला आहे. त्यामुळे पूर्णपणे फेशियल हजेरीचा वापर केल्यांनतर ते किती यशस्वी ठरले आहे याची माहिती नसल्याने ज्याठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वापर केला आहे, तिथे पूर्ण क्षमतेने फेशियल हजेरीचा वापर केला जावा. तसेच इतर २५ ठिकाणी पूर्ण क्षमतेने फेशियल हजेरीचा वापर करण्यासाठी यंत्रे बसवण्यात यावी, त्यादृष्टीकोनातून कार्यवाही केली जावी,अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह इतर कार्यालयांमध्ये २५ ठिकाणी फेशियल हजेरीच्या प्रणालीची यंत्रे बसवली जाणार असून त्यादृष्टीकोनातून कर्मचाऱ्यांची आधारसह हजेरीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली जात आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्याठिकाणी प्रायोगिक तत्वावर फेशियल बायोमेट्रीक हजेरी प्रणालीवर दोन्ही प्रकारे हजेरी नोंदवली जाते. त्यामुळे केवळ फेशियल हजेरीद्वारेच ही हजेरी नोंदवली जात नसल्याने सर्व प्रथम पूर्णक्षमतेने फेशियलद्वारेच हजेरी याठिकाणी नोंदवली जावी आणि याशिवाय इतर १० ते १५ ठिकाणी अशाप्रकारची यंत्रे बसवून पूर्णपणे फेशियलद्वारेच हजेरी नोंदवली जावी, अशाप्रकारचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. याचा निकाल काय पहायला मिळतो, त्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community