महाराष्ट्र राज्य शासनाच्या सुचनेनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानाचा प्रारंभ सोमवारी २६ सप्टेंबर २०२२ पासून करण्यात आला आहे. यामध्ये नवरात्रौत्सवात १८ वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेची नागरी आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसुतिगृहे, सर्वसाधारण रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये येथे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत महिलांची प्राथमिक तपासणी, उपचार व समुपदेशन करत स्त्रियांच्या आरोग्याविषयी जनजागृती केली जाणार आहे.
( हेही वाचा : महापालिकेत आता पूर्ण क्षमतेने आधार व्हेरिफाईड फेशियल हजेरी; आणखी २५ ठिकाणी बसवणार प्रणाली )
‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’, महिलांसाठी विशेष अभियान
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यात १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वंकष आरोग्य तपासणीसाठी २६ सप्टेंबर २०२२ पासून नवरात्री उत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे. १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करुन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. याविषयी सविस्तर माहिती देताना महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीनेही मुंबईत ही मोहीम राबवली जाणार आहे. महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत १८ वर्षांवरील महिलांकरीता ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अशी विशेष मोहीम महानगरपालिका राबविणार असून नवरात्री मंडळात स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे, असे डॉ. गोमारे यांनी नमूद केले.
१८ वर्षावरील सर्व महिलांना २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सेवा
महानगरपालिकेच्या संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनीही याबाबत सांगताना, महिलांच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन देखील या अभियानातून करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. या अभियानात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी तथा तज्ञ डॉक्टरांमार्फत मुंबई महानगरपालिकेची नागरी आरोग्य केंद्रे, दवाखाने, प्रसुतिगृहे, सर्वसाधारण रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये येथे २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत महिलांची प्राथमिक तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात येईल. तसेच विभागात वस्तीपातळीवर महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. तपासणी केलेल्या नागरी आरोग्य केंद्रामधील ज्या महिलांना उपचाराची आवश्यकता असेल त्यांना नजीकची प्रसुतिगृहे, सर्वसाधारण रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयांमार्फत तपासणी व उपचारासाठी पाठवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या अभियान अंतर्गत १८ वर्षावरील सर्व महिलांना २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ही सेवा देण्यात येणार आहे. तर शालेय आरोग्य विभागाच्या वतीने महानगरपालिका शाळेतील मुलींची तपासणी, उपचार, समुपदेशन व मार्गदर्शनही या कालावधीत करण्यात येणार आहे, असेही डॉ. दक्षा शहा यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील १८ वर्ष वयावरील सर्व मुली व स्त्रियांनी या अभियानाचा व त्याद्वारे आयोजित करण्यात येणा-या या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community