सोनसाखळी चोरी आणि बोलबच्चन गॅंग या टोळ्या गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत आहेत. सोनसाखळी चोरी करणारी टोळी आणि बोलबच्चन टोळी या दोन टोळ्यांनी मुंबईतील रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र खेचून पळणे तसेच जेष्ठ नागरिकांना लक्ष करून त्यांना बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन लंपास होणे ही या दोन टोळ्यांची वैशिष्ट्ये आहेत. या टोळ्यांवर पोलिसांनी अनेकदा कारवाई करून देखील जामिनावर बाहेर आल्यानंतर या टोळ्या पुन्हा एकदा गुन्हे करण्यासाठी सक्रिय होत असतात. या टोळीतील अनेक सदस्यांनी गुन्ह्याची शतके गाठलेली आहेत तर अनेकावर २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. सण-उत्सवात या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय होत असल्यामुळे अशा वेळी महिला आणि जेष्ठ नागरिकांनी सतर्क राहून या गुन्हेगाराचा डाव हाणून पाडला पाहिजे, या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टॉप्स मोस्ट गुन्हेगारांची छायाचित्रे हाती लागली आहेत, जेणेकरून मुंबईकरांनी या टोळीपासून सावध राहावे.
मुंबई शहरात मागील आठ महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी उत्सव नवरात्री, दिवाळी, तसेच लग्नाच्या हंगामात या प्रकरणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठ महिन्यात मुंबई शहरात १४३ सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले असून त्यातून १०७ गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत सोनसाखळी चोरीचे गुन्हे वाढले असून गेल्यावर्षी आठ महिन्याची आकडेवारी काढली असता केवळ ९४ सोनसाखळी चोरीच्या घटनेची नोंद झाली होती. यंदा मात्र त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरी पाठोपाठ मुंबईत बोलबच्चन टोळीचा मोठा बोलबाला आहे, बोलबच्चन टोळ्या या जेष्ठ नागरिकांना आपले लक्ष्य करून त्यांची फसवणूक करीत असल्याचे गुन्हे मुंबईत दाखल होत आहेत. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये १८ ते ३० वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात असून बोलबच्चन टोळीत ४० ते ५५ वयोगटातील पुरुष मोठ्या प्रमाणात आहेत. या दोन्ही गुन्ह्यात ईराणी नागरिकांचा मोठा समावेश असल्याचे आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईत समोर आलेले आहे.
मुंबई, ठाणे आणि पुण्यात मोठमोठ्या ईराणी नागरिकांच्या वस्त्या वाढलेल्या आहेत. मुंबईतील घाटकोपर पश्चिम एलबीएस रोड, ठाण्यातील कल्याण, आंबिवली या ठिकाणी सर्वात मोठी ईराणी नागरिकांची वस्ती आहे. पुण्यात देखील इराणी वस्त्या वाढलेल्या आहेत. रस्त्यावर चष्मे, ब्लँकेट विकणाऱ्या या जमातीतील काही लोक हातचलाखी करून लोकांची फसवणूक करतात. तर यांच्यातील तरुणवर्ग झटपट पैसा कमविण्यासाठी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याकडे वळला आणि बघता बघता ही संख्या झपाट्याने वाढत गेली. या टोळीने मागील अनेक वर्षांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व आजूबाजूच्या शहरामध्ये सोनसाखळी चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. पोलिसांकडून या टोळीला अटक केल्यानंतर ही टोळी जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा या गुन्ह्याकडे वळतात आणि पुन्हा गुन्हे करू लागतात अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे सोनसाखळी चोर कालांतराने वय झाल्यानंतर बोलबच्चन टोळीकडे वळतात. रस्त्यावर एकट्या दुकट्या जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना रस्त्यात गाठून त्यांना कधी पोलीस असल्याची बतावणी करून तर कधी ‘आमच्या शेठजीला मुलगा झाला आहे, ते साडी वाटप करीत असल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवतात आणि जेष्ठ नागरिकांकडे असणारे मौल्यवान वस्तू घेऊन पळून जातात. ही टोळी संघटित गुन्हेगारी करीत असल्याचे काही प्रमाणात समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका ) या अतंर्गत देखील कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोरोनाच्या काळात तुरुंगातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी न्यायप्रविष्ट आरोपीना जामीन देण्याचे तसेच शिक्षा झालेल्याना संचित रजा देण्याचे आदेश तत्कालीन सरकारने दिल्यानंतर अनेक गुन्हेगार त्यावेळी जामिनावर बाहेर पडले आहेत, त्यात सोनसाखळी चोर हे मोठ्या प्रमाणात जामिनावर बाहेर आलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलतेनंतर या टोळ्या पुन्हा सक्रिय झालेल्या असून आजतोगायत या टोळ्यांनी मुंबईत धुमाकूळ घातला असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सण उत्सवात या टोळ्या अधिकच सक्रिय होत असतात, गणेशोत्सव नंतर या टोळ्य्याच्या लक्ष्यावर नवरात्रोत्सव, दिवाळी इत्यादी असून या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर पडलेल्या टॉप्स मोस्ट सोनसाखळी चोर आणि बोलबच्चन टोळीतील सदस्यांची छायाचित्रे हाती लागलेली असून या छायाचित्रातील टोळ्यापासून मुंबईकरांनी सावध राहायला हवे आहे.
सोनसाखळी चोर १ ) अंजान हबीब खान २) इब्राहिम मोहम्मद हनीफ शेख ३) प्रकाश नारायण दासगावकर ४) शत्रुघन नवल शर्मा ५)छक्कनलाल बाबुलाल सोनकर ६) राजू मधुकर पाटील ७) विशाल मानसा यादव ८) अब्दुल हमीम अब्दुल ९) तारू मोहम्मद अली शेख १०) मोहम्मद शरीफ असगर अली ११) जॉन मायकेल डिसोजा १२) अमजद खुर्शीद खान १३) नरेश नामदेव गायकवाड १४) अजय देवनाथ १५) अनिकेत शंकर मानके १६) मोहम्मद मुस्तकिन नजीर नावी १७) असिफ नूर नबी खान १८) शुभम सिंह १९) विनोद जाधव २०) मोहम्मद नौशाद मोहम्मद आयाज खान २१) गोविंद सिंग २२) ननसो थोरात २३) उमाशंकर पांडे २४) मोहम्मद फिरोज मसलुद्दीन मन्सुरी
Join Our WhatsApp Community