मुंबई महापालिकेच्यावतीने सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास केला जात असून शीव कोळीवाडा येथील सरदार नगर इमारत क्रमांक ए१ आणि ए२ या दोन इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपुजन सोमवारी पार पडले. स्थानिक माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते रवी राजा या भूमिपुजनाला भाजपचे स्थानिक आमदार तमिल सेल्वन आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे तिन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर होते. मागील काही दिवसांपासून माजी विरोधी पक्षनेते रवी राजा हे काँग्रेसच्या नेत्यांवर नाराज असलेले पहायला मिळत असून मागील काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी रस्ते कामांच्या निविदासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही राजा हे गैरहजर होते. त्यामुळे राजा हे नाराज असतानाच भाजप आमदार आणि शिंदे गटाच्या खासदारांसमवेत ते एकाच ठिकाणी दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महापालिकेच्या आश्रय योजनेतंर्गत शीव कोळीवाडा येथील सरदार नगरमधील दोन इमारतींचा पुनर्विकास करण्यात येत असून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सोमवारी महापालिकेच्यावतीने या योजनेतंर्गत पुनर्विकास कामाच्या शुभारंभाकरता श्रीफळ वाढवण्यात आले आहे. रावळी कॅम्प फायर ब्रिगेड समोरील या दोन्ही इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते व स्थानिक काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी राजा यांच्यासह खासदार राहुल शेवाळे आणि भाजपचे आमदार तमिल सेल्वन यांच्याहस्ते पार पडले. यावेळी महापालिका उपायुक्त डॉ संगीता हसनाळे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व रहिवाशी उपस्थित होते.
रवी राजा यांच्याहस्ते कामाचा शुभारंभ करण्यात येत असताना आमदार आणि खासदारही उपस्थित राहिले आणि तिघांनीही कोणत्याही प्रकारचा रागद्वेष न दाखवता खेळीमेळीने श्रीफळ वाढवले. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा असून त्यामुळे जगताप हे राजा यांना बाजुला करत असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेच्या प्रभागांच्या रचनेबाबत तसेच प्रभागांची संख्या २२७ एवढी करण्यासंदर्भात माजी मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळात रवी राजा यांचाही समावेश होता. तेव्हापासून ही ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
सरदार नगर इमारत क्रमांक ए वन आणि ए टू या दोन इमारतींचे एकूण क्षेत्रफळ १०००चौरस एवढी असून या दोन्ही इमारतींच्या पुनर्विकासामध्ये ३०० चौरस फुटांचे ११२ बांधण्याचे विभागाने प्रस्तावित केले होते. या इमारतीच्या पुनर्विकासाच्या कामासाठी महापालिकेने शायोना कॉर्पोरेशन कंपनीची निवड केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून ३०० चौरस फुटांच्या ११४ सदनिका बांधल्या जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community