रायगड जिल्ह्यातील उरण शहरानजीक असलेल्या करंजा गावाच्या समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद बोट दुरुस्तीसाठी तिथे आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे. उरण पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या बोटीचा शाफ्ट तुटल्याने ती दुरुस्तीसाठी करंजा येथे आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय या बोटीवर दोन खलाशी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या बोटीची कागदपत्रे तपासली जात आहेत.
नेमके प्रकरण काय?
उरण इथल्या करंजा समुद्रकिनारी एक संशयास्पद बोट ताब्यात घेतली असून, उरण पोलीस तपास करत आहेत. रविवारी रात्रीच्या सुमारास मस्त्य विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना उरणनजीकच्या समुद्रकिनारी मच्छीमारी बोट आढळली होती. या बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने संथय निर्माण झाला होता. रेवस बंदरातील सुरक्षारक्षकांनी पाठलाग करत ही बोट ताब्यात घेतली. यावेळी मत्स्य विभागाच्या अधिका-यांनी या बोटीची चौकशी केली असता तिची कागदपत्रे न मिळाल्याने संशय निर्माण झाला होता. परंतु बोटीची तपासणी केली असता ही बोट मुंबईतील गोवंडी येथील श्रवणकुमार कनोजिया यांच्या मालकीची असून ती बोट ससूनडाॅक येथील नवनाथ वराळ यांना मासेमारीसाठी देण्यात आली होती.
( हेही वाचा: ‘प्राध्यापकांचे पगार आम्ही देऊ, तुम्ही महाविद्यालयांची फी कमी करा’, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे आवाहन )