अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य दाऊदचा निकटवर्तीय समजला जाणारा रियाज भाटी याला मुंबई गुन्हे शाखेने एका खंडणी,धमकी प्रकरणात अटक केली आहे. वर्सोवा येथील एका व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे आणि महागडी मोटार खंडणीच्या स्वरूपात उकळल्या प्रकरणी रियाज भाटी याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुट आणि भाटी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वर्सोवा येथे राहणाऱ्या एका व्यवसायिकाला छोटा शकील याचा मेहुणा सलीम इकबाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाज भाटी याने दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये किमतीची महागडी मोटार कार आणि ७ लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात उकळले होते. दाऊद आणि छोटा शकीलच्या भीतीने या व्यवसायिकाने त्यावेळी तक्रार दाखल केली नव्हती, मात्र सलीम फ्रुट याला एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर या व्यवसायिकाने मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात तक्रार दाखल केली.
( हेही वाचा: महापालिकेत आता पूर्ण क्षमतेने आधार व्हेरिफाईड फेशियल हजेरी; आणखी २५ ठिकाणी बसवणार प्रणाली )
याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री रियाज भाटी याला अंधेरी येथून अटक केली आहे. मंगळवारी त्याला किल्ला न्यायालय येथे हजर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेला सलीम फ्रुट याचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रियाज भाटी हा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय समजला जातो. त्याच्यावर खंडणी, जमीन बळकावणं, फसवणूक आणि गोळीबार अशा अनेक प्रकरणांमधील गुन्हे दाखल आहेत. २०१५ आणि २०२० मध्ये न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्यावर गोरेगाव येथे २०२१ मध्ये दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात रियाज भाटी याचे नाव होते.
Join Our WhatsApp Community