सिनेक्षेत्रातील मानाच्या अशा दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ सिने अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्काराने यंदाच्या वर्षी सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. आशा पारेख यांनी सिनेक्षेत्रात केलेल्या असमामान्य कामगिरीबाबत त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार
भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेक्षेत्रात उत्तुंग आणि उल्लेखनीय कामगिरी करणा-या कलावंत तसेच तंत्रज्ञांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येते. त्यामुळे सिने क्षेत्रातील कलावंतांसाठी हा एक सर्वोच्च आणि मानाचा असा पुरस्कार आहे. 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार भारत सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यंदाच्या या पुरस्कारासाठी आशा पारेख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
आशा पारेख यांची यशस्वी कारकीर्द
आशा पारेख यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अमूल्य असे योगदान दिले आहे. 1959 ते 1973 या 14 वर्षांच्या काळात आशा पारेख या हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री राहिल्या आहेत. माँ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आशा पारेख यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. दिल देके देखो या सिनेमातून प्रमुख अभिनेत्री म्हणून त्या लोकांसमोर आल्या. हा चित्रपट चांगलाच गाजला आणि त्यामुळे आशा पारेख यांना लोकप्रियता मिळाली. आतापर्यंत 80 गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेत्री म्हणून काम केले आहे. सुमारे भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदही आशा पारेख यांनी भूषविले आहे.
Join Our WhatsApp Community