संजय राऊत यांचा दसराही तुरुंगातच जाणार, न्यायालयाकडून तत्काळ दिलासा नाहीच

191

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने ही सुनावणी 10 आक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना न्यायालयाने दिलासा दिला नसून राऊतांचा दसराही आता तुरुंगातच जाणार आहे.

10 ऑक्टोबरला होणार सुनावणी

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईत संजय राऊत हे दोषी आढळल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊत यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान राऊत यांनी पीएमएलए न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी न्यायालयाने आता 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

न्यायालयात युक्तिवाद

मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान संजय राऊत यांच्या वकिलांकडून न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यात आला. तर 10 ऑक्टोबर रोजी होणा-या सुनावणीत ईडीची बाजू न्यायालयाकडून ऐकण्यात येणार आहे. ईडीने यापूर्वी झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध केला होता.

ईडीची मागणी

1 हजार 39 कोटी 79 लाखांचा पत्राचाळ आर्थिक घोटाळ्याचा तपास सध्या महत्वपूर्ण टप्प्यावर आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संजय राऊत यांना जामीन देऊ नये, अशी मागणी ईडीकडून न्यायालयाला याआधीच्या सुनावणीत करण्यात आली होती. ईडीने या घोटाळ्यात संजय राऊत यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत, असे सांगितले होते. राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर झालेला 1 कोटी 8 लाख रुपयांचा व्यवहार देखील संशयास्पद आहे. असे अनेक संशयास्पद आर्थिक व्यवहार ईडीला सापडले असून त्याचा सखोल तपास ईडीला करायचा आहे.

संजय राऊत हे राजकीय व्यक्तिमत्व असल्याने ते तपासात आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. तसेच राऊत यांनी एका महिलेला याबाबत धमकावले असल्याचेही ईडीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे राऊत यांना जामीन नाकारण्यात यावा, अशी मागणी ईडीने न्यायालयात केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.