शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या येत्या दसरा मेळाव्यात जोरदार वाक् युद्ध रंगले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हे एकमेकांचे कपडे किती उतरवतात याकडेच सर्वांचे लक्ष आहे. हा दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा तसेच अस्तित्वाच्या लढाईचा ठरणार असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही सभांच्या ठिकाणी मोठा जनसमुदाय जमवण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आजवर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन होत असले, तरी मूळ शिवसेनेवर दावा केल्यानंतर शिंदे गटाचा पहिलाच मेळावा असल्याने शिंदे यांच्या मेळाव्याकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. या मेळाव्यात शिंदे हे ठाकरे शिवसेना आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुराव्यानिशी पोलखोल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
दोन्ही गटात स्पर्धा
शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. मात्र त्याच दिवशी शिवसेनेवर दावा करणाऱ्या शिंदे गटाचा दसरा मेळावाही वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानावर होणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही सभांची वेळ ही एकच आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास या सभा होणार असल्याने दोन्ही गटाचे नेते आणि प्रमुख हे एकमेकांवर कसे तुटून पडतात. यात कोण कोणापेक्षा सरस ठरतोय हे पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करत आले आहेत. मात्र यावर्षी शिंदे गट स्वतंत्र झाल्याने शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्वाधिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे आपल्याकडे असल्याचे सांगत शिंदे गटाने मूळ शिवसेनेवर दावा करत, हा दसरा मेळावा शिवसेनेच्या परंपरेनुसार आपण आयोजित करत असल्याचे सांगितले. त्या दृष्टीकोनातूनच शिंदे गटाने वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.
(हेही वाचा शिवभोजन थाळी योजना कायम; प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री देखरेख ठेवणार)
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पहिला मेळावा
एकीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा आणि त्याच दिवशी, त्याच वेळेत शिवाजी पार्कवर शिवसेनेचा परंपरागत ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. महत्वाचे म्हणजे दोन्ही मेळावे एकाच वेळी होत असल्याने नक्की शिवसैनिकांची गर्दी कोणत्या मेळाव्यात अधिक असते. कोणत्या मेळाव्यात सर्वाधिक जास्त गर्दी आहे, याचे मोजमाप करण्यासाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. मात्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा पहिला मेळावा असल्याने ते मूळ शिवसेनेवर दावा करत असताना, ठाकरे गटावर काय तोंडसुख घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मेळाव्यात ठाकरे यांच्या विरोधातील काही पुरावे सादर करून त्यांची पोलखोल करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे यांनी या मेळाव्यासाठी बरीच मोठी रसद तयार करून ठेवलेली आहे. विविध कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे एक प्रकारे मोठा दारूगोळा तयार असून मेळाव्याच्या दिवशी हा दारुगोळा फोडून फटाक्यांची आतषबाजी करत शिंदे गट हा मोठ्या धुमधडाक्यात दसरा मेळावा साजरा करणार असल्याचे बोलले जात आहे. या मेळाव्यात हिंदुत्वाशी उद्धव ठाकरे यांनी कधी कधी आणि कशी फारकत घेत सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे, याची काही जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा बुरखा फाडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community