नैसर्गिक जलसाठ्यात प्रदूषण असल्याचे पुरावे देणा-या जलपर्णी या वनस्पतीने तलाव, नदी – नाल्यांत दिसतात, आता त्या समुद्रातही दिसू लागल्या आहेत. दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात मिठी नदी आणि माहिम खाडी, दादर चौपाटीतील समुद्रात जलपर्णी आढळून आल्या आहेत. याबाबत चिंतेचे कारण नसल्याची माहिती पर्यावरणप्रेमी अभ्यासकांनी दिली आहे.
मिठी नदीतील जलप्रदूषण थांबवण्याची मागणी
मुंबईतील कलिना परिसरातील मिठी नदीचा परिसर तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदीचा परिसर यात गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा थर तरंगताना दिसत आहे. कुर्ल्याहून कलिना येथील खासगी विमानतळ परिसरात जाणा-या भागांत सांडपाण्यामुळे मिठी नदीतील जलप्रदूषण सतत वाढत आहे. संपूर्ण नदीकाठच्या भागांवर जलपर्णींचा विस्तार झाल्याने परिसरातील भंगाराच्या दुकानातून तसेच छोट्या उद्योगधंद्यातून थेट नदीपात्रात सांडपाणी सोडण्यावर बंदी घातली जावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत.
समुद्री परिसंस्थेलाही धोका नाही
गोड्या पाण्यात वाढणारी जलपर्णी ही प्रामुख्याने मुंबईतील पवई तलावातही आढळते. सहा महिन्यांपूर्वी पालिका अधिका-यांनी तलावातील जलपर्णी छाटून टाकली. या जलपर्णींचे झुपके अजूनही गटारे, मिठी नदीच्या पात्रात आढळून येत आहे. पावसाचा जोर वाढला की तलावात छाटून ठेवलेली जलपर्णी गटारे, मिठी नदी ते थेट दादर, माहिमच्या समुद्रापर्यंत जाते. सप्टेंबर महिना संपत आला तरीही जलपर्णीचे थर या संपूर्ण पट्ट्यात दिसून येत आहेत. जलपर्णीं खा-या पाण्यात टिकू शकत नाही. खा-या पाण्यातील समुद्रात जलपर्णी सडून नष्ट होतात, या प्रक्रियेचा समुद्री परिसंस्थेलाही धोका नाही, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. त्यामुळे जलपर्णी नदी किंवा समुद्रातील पाण्यात आढळून आल्यास घाबरू नका, असे आवाहनही पर्यावरणप्रेमी अभ्यासकांनी केले.
Join Our WhatsApp Community