दहिहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या २२ वर्षांच्या गोविंदाला मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या पाच लाखांची मदत केली. ही मदत शिवसेना प्रवक्ते व ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रथमेश सावंत याला सुपुर्द केली आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा दिला.
( हेही वाचा : मुंबईकरांच्या खिशाला कात्री! रिक्षा – टॅक्सीचा प्रवास महागला, जाणून घ्या नवे दर)
करीरोड येथील साईभक्त क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील प्रथमेश सावंत हा गोविंदा थर लावताना खाली पडल्याने जखमी झाला असून, मणक्याच्या पॅरेलिसीसला सामोरे जावे लागले आहे. त्याच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील के.ई. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रथमेश सावंत याचे आईवडील हयात नसून, त्याचा सांभाळ नातेवाईक करीत आहे. त्याला आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या त्याला पाच लाखांची मदत केली आहे. शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी के.ई.एम. रुग्णालयात प्रथमेश सावंत याची भेट घेवून त्याची विचारपूस केली व पाच लाखांची मदत सुपुर्द केली.
सरकार आणि शिवसेना पाठीशी
सरकार प्रथमेशच्या पाठीशी आहेच, पण शिवसेना सदैव त्याच्या सोबत असल्याची ग्वाही त्याला नरेश म्हस्के यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत प्रथमेश सावंत याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून असल्याबाबत व त्याला वैयक्तिकरित्या पाच लाखांची मदत केल्याबद्दल प्रथमेशचे नातेवाईक व साईभक्त क्रीडा मंडळाच्या गोविंदा पथकांने त्यांचे आभार व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community