जागतिक पर्यटन दिन : महाराष्ट्र पर्यटन गीताचे लोकार्पण

165

राज्याला गडकिल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विषयक प्रसिध्दी मोहीम, पर्यटनाबाबत सामंजस्य करार, पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार, गायक शंकर महादेवन व अमृता फडणवीस यांनी गायलेल्या महाराष्ट्र पर्यटन गीताचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यासह पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

( हेही वाचा : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याचे पोलिसांपुढे आव्हान )

पर्यटन मंत्री लोढा म्हणाले, यंदाचे पर्यटन हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर पर्यटनाला नवे दिशा देणारे ठरावे यासाठी ‘पर्यटन- नवा विचार, नवी दिशा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यही पर्यटन क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण एक आंतरराष्ट्रीय पर्यटक हा नऊ जणांना रोजगार देतो. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी शासन आपल्या पाठीशी आहे.आपल्या काही नवकल्पना असतील आणि पर्यटन क्षेत्रात त्या आणण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. पर्यटन विभाग अधिक शाश्वत, लवचिक आणि समावेशक पर्यटन स्वीकारून राज्यातील पर्यटनाची परिभाषा अद्यान्वयित करण्यासाठी प्रयत्नशील आहे असेही पर्यटनमंत्री लोढा म्हणाले.

https://twitter.com/maha_tourism/status/1574758966038790146

मुंबईतील 75 व्हिडिओ’ लाँच

मुंबई व्हिडिओ मालिका प्रकल्पामध्ये लोकप्रिय आणि पर्यटकांच्या आकर्षणाच्या ठिकाणांभोवती हे चित्रीत करण्यात आले आहेत. स्थानिक तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी प्रेक्षणीय स्थळांना महत्त्व देणारी पर्यटन स्थळे यात समाविष्ट आहेत. मुंबईतील 200 पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र पर्यटनाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर याचे व्हिडीओ साप्ताहिक पोस्ट केले जातील.

अनलिमिटेड महाराष्ट्र पॉडकास्टसह ‘कानोदेखी’ लाँच

पॉडकास्ट हे पर्यटनाला चालना देणारे सर्वात महत्त्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाते.पर्यटनाचा कायापालट करण्याचा एक भाग म्हणून, ‘अनलिमिटेड महाराष्ट्रासह कानोदेखी’ ही मालिका रेडिओ सिटी ९१.१ एफएमवर साप्ताहिक ६ महिन्यांसाठी प्रसारित केली जाईल, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध भाग दाखवले जाणार आहेत.

टीव्ही मोहिमेचा शुभारंभ

महाराष्ट्रातील विशिष्ट पर्यटन स्थळे आणि अनुभवांना प्रोत्साहन देण्यासाठी, पर्यटन विभागाने महाराष्ट्र पर्यटनाच्या चांगल्या जाहिराती आणि प्रसिद्धी एकत्रित करण्यासाठी 4 दूरचित्रवाणी मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत.

हिस्टरी टीव्ही १८ यांच्या द्वारे रोड ट्रिप विथ आर एन एम या शीर्षकांतर्गत महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांसह स्थानिक खाद्य संस्कृती वर आधारित भागाची निर्मिती करून CNN, NEWS 18 व CNBC या दूरचित्रवाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, अलिबाग, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक मधील किल्ले, मंदिरे, कला आणि संगीत, वन्यजीव, महाराष्ट्रातील आश्चर्ये, सण आणि बांधकामाच्या थीम वर आधारित कार्यक्रम व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ आणि डेस्टिनेशनचा प्रचार करण्यासाठी काही खास कार्यक्रम नॅशनल जिओग्राफिक चॅनल आणि फॉक्स लाईफ, रोड ट्रिप विथ RNM, हिस्ट्री TV18 SD आणि History TV18 HD वर प्रसारित केले जाईल.

New Project 4 17

360 व्हिडिओ, पॉडकास्ट आणि व्लॉग लाँच

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवान आणि टेक्नो-सॅव्ही जगाच्या बरोबरीने राहण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्रातील सर्व 6 युनेस्को हेरिटेज साइट्सचे 360 डिग्री व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) व्हिडिओ, पॉडकास्ट आणि व्लॉग तयार करत आहे. यामध्ये अजिंठा लेणी, एलोरा लेणी, एलिफंटा लेणी, सीएसएमटी रेल्वे स्टेशन. मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल मध्ये मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ (राजाबाई क्लॉक टॉवर, विद्यापीठ ग्रंथालय आणि दीक्षांत सभागृह), पश्चिम रेल्वेचे मुख्यालय, छत्रपती संग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, बृहन्मुंबई महानगरपालिका इमारत (BMC), जीपीओ, तार इमारत, पश्चिम घाट (सह्याद्री रांगा), कास पठार, राधानगरी (दाजीपूर) वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान, सांगली, कोयना वन्यजीव अभयारण्य, सातारा या स्थळांचा समावेश आहे.

पर्यटनवाढीसाठी इंडियन ऑइल, हाफकीन इन्स्टिट्यूट, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) यांच्याशी सामंजस्य करार

महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 अंतर्गत अद्वितीय पर्यटन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी, पर्यटन विभागाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) सोबत, मुंबईचे सर्वात प्रतिष्ठित स्मारक (ध्वनी आणि प्रकाश शो), गेटवे ऑफ इंडिया उजळण्याच्या इच्छेने सामंजस्य करार केला.
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) सोबत महाराष्ट्रातील खाण आणि खनिजांचा खजिना उलगडण्यासाठी अनोखा व प्रायोगिक मार्ग उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रात खाण पर्यटन संकल्पना सुरू करण्याबाबत एक सामंजस्य करार करण्यात आला. हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच मुंबईतील वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि स्थापत्यकलेची जाणीव निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाने मुंबईतील हाफकाईन इन्स्टिट्यूट आणि बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज येथे हेरिटेज वॉक सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या उद्देशाने आज त्यांच्यासोबत बिगर आर्थिक सामंजस्य करार करण्यात आले.

शहरातील 7 माहिती पुस्तकांचे उद्घाटन

देशी-परदेशी पर्यटकांना राज्यात आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाने पर्यटन स्थळे म्हणून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांची माहितीपत्रके तयार केली असून ही माहितीपत्रके संबंधित शहरातील निवडक हॉटेल्समध्ये ठेवल्या जातील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, सूत्रसंचालन कल्पना साठे, आभार मिलिंद बोरीकर यांनी मानले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.