बीडीडी चाळींप्रमाणेच करा बीआयटी चाळींचा पुनर्विकास; पोलिस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देण्याची शिवसेनेची मागणी

153

माझगाव येथील ताडवाडीतील रखडलेल्या बीआयटी चाळींसह मुंबईतील महापालिकेच्या अखत्यारित येत असलेल्या सर्व बीआयटी चाळींचा पुनर्विकास हा बीडीडी चाळींच्या धर्तीवर करण्याची मागणी करत भाडेकरूंना किमान ५०० चौरस फुटांचे घर मिळावे अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच ताडवाडीच्या बीआयटी चाळींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंसह काही पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांची कुटुंबे तीन ते चार पिढ्यांपासून राहत असून त्यांनाही बीडीडी चाळींच्या धर्तीवर १५ लाखांमध्ये मालकी हक्काने घर घेण्याची मागणी शिवसेना उपनेते आणि माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माझगाव ताडवाडीच्या रखडलेल्या पुनर्विकासामुळे आजही येथील धोकादायक इमारतींमधील २२० कुटुंबे माहुल मधील संक्रमण शिबिरांमध्ये राहत असून अजुन येथील इमारती धोकादायक होऊन येथील कुटुंबांना संक्रमण शिबिरांमध्ये जाण्याची वेळ येवू नये यासाठी ताडवाडीच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्याची मागणी माजी नगरसेवक व शिवसेना उपनेते मनोज जामसूतकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन दिले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना जामसूतकर यांनी ताडवाडीमध्ये बीआयटी चाळी असून लव्हलेनमध्येही तीन इमारती आहेत. यातील काही इमारती धोकादायक झाल्याने येथील भाडेकरून २०१६मध्ये माहुलमधील संक्रमण शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान ताडवाडीचा पुनर्विकास प्रकल्पाबाबत महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने येथील चाळींच्या दुरुस्तीसाठी आपण स्वत व आपली पत्नी नगरसेविका असताना दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करून घेऊन याची कामे केली आहे. परंतु वर्षांनुवर्षे येथील भाडेकरून जुन्या इमारतीतील छोट्या घरांमध्ये राहत असून याठिकाणी सरकारने पुढाकार घेऊन बीडीडी चाळींच्या धर्तीवर पुनर्विकास प्रकल्प राबवावा अशी मागणी केली आहे. बीआयटी आणि बीडीडी चाळींमधील घरांचे क्षेत्रफळ १६० चौरस फुटांचे आहे. बीडीडी चाळींकरता सरकारने धोरण बनवले असून त्यानुसार ताडवाडीतील या चाळींसह बीआयटी अन्य ठिकाणी उभ्या असलेल्या चाळींचा पुनर्विकास करून किमान ५०० चौरस फुटांच्या घरी दिली जावू शकतात. त्यामुळे माझगाव ताडवाडीतील बीआयटी चाळींमध्ये भाडेकरूंसह ५५पोलिस कुटुंबे आणि काही महापालिका कर्मचाऱ्यांची कुटुंबे पिढ्यान पिढ्या राहत असल्याने त्यांना शासनाच्या धोरणानुसार १५ लाख रुपये आकारुन मालकी हक्काने घरे देण्याची मागणीही जामसूतकर यांनी केली.

New Project 2 19

माझगाव ताडवाडी येथील बीआयटीच्या १६ इमारती, आग्रीपाडा २४ इमारती, मुंबई सेंट्रलला १९, चिंचबंदरला ०७, मांडवी कोळीवाडा ०५, परळला ०६, नागपाडा ०३, लव्हलेन ०३, अशाठिकाणी बीआयटी चाळी असून त्याठिकाणी सुमारे साडेचार ते पाच हजार कुटुंबे राहत आहेत. त्यामुळे बीडीडी चाळींप्रमाणे या बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचे स्वप्न चाळकरी बघत असून सरकारने तातडीने पाऊल उचलून महापालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम हाती घ्यावे अशी मागणही त्यांनी केली आहे.

भाडेवाढीचा तीव्र विरोध

महापालिकेच्या मालमत्तांच्या भाड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे याचा फटका माझगावमधील बीआयटी चाळींसह इतर ठिकाणच्या बीआयटी चाळींमधील गरीब कुटुंबांनाही बसला आहे. यामध्ये चाळींच्या भाड्याची आकारणी आता प्रति चौरस फूट ३ रुपये दराने करण्यात आली असून यामुळे २५ ते ४० रुपयांचे भाडे आता ५५० रुपयांमध्ये पोहोचले आहे, तर हस्तांतरण शुल्कांमध्येही दुप्पट ते तिपटीने वाढ केली आहे. या चाळींना सध्या कोणत्याही प्रकारची महापालिकेची सुविधा नसताना अशाप्रकारच्या शुल्क वाढीला शिवसेना पक्ष विरोध करत असल्याचे जामसूतकर यांनी स्पष्ट केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील यांच्यासह इतर मंडळी उपस्थित होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.