जागतिक हृदय दिन : आपल्या आरोग्याबद्दल प्रत्येकाने सजग आणि जागृत राहण्याची गरज!

141

वाढत्या हृदयविकाराच्या आजार टाळण्यासाठी सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नियमितपणे रक्तदाब तपासणी करणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करुन योग्य ते औषधोपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर दररोज किमान ३० मिनिटे चालणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य तो व्यायाम करणे, या बाबीदेखील आवश्यक असल्याचे सांगत २९ सप्टेंबर च्या जागतिक हृदय दिनानिमित्त आपल्या हृदयाबद्दल आणि एकूणच आरोग्याबद्दल आपण सजग आणि जागृत असणे गरजेचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : महापालिकेसाठी ३ हजार संगणकांची खरेदी : एका संगणकाची किंमत पाहून आवाक व्हाल)

महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे lk) डॉक्टर संजीव कुमार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये “हृदयाचे आरोग्य आणि सीपीआर” याबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील निवासी सोसायटी, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे योग्य ते नियोजन करण्यात येत आहे.

सडन कार्डियाक अरेस्ट आल्यास सीपीआर कसे महत्वाचे

एखाद्या व्यक्तिचे हृदय अचानक बंद पडणे, याला वैद्यकीय परिभाषेत ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (Sudden Cardiac Arrest / SCA) असे म्हणतात. ही एक धोकादायक स्थिती असून त्यावर त्वरित उपचार न केल्यास, त्या व्यक्तिचे प्राण वाचवणे खूप कठीण असते. अशा वेळेस त्या ठिकाणी जवळपास हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तिने हृदय बंद पडलेल्या व्यक्तिच्या हृदयावर एका विशिष्ट पद्धतीने दाब दिल्यास त्यामुळे मेंदुचा व हृदयाचा रक्तपुरवठा सुरु राहण्यास मदत होते. या प्रक्रियेस वैद्यकीय परिभाषेत ‘सीपीआर’ (Cardiopulmonary Resuscitation) असे म्हणतात. वेळेत व तात्काळ ‘सीपीआर’ दिल्यामुळे संबंधित व्यक्तिचे प्राण वाचू शकतात. हृदय बंद पडल्यापासून रुग्णालयात नेईपर्यंतचा हा कालावधी रुग्णासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे याबाबत जनसामान्यांमध्ये जागरुकता वाढविणे व व्यापक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविले आहे.

अशाप्रकारे वाचवले महापालिकेच्या डॉक्टराने मेट्रोतील प्रवासी महिलेचा प्राण

काही दिवसांपूर्वी घाटकोपर मेट्रो स्टेशनवर एक २३ वर्षीय महिला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. शेजारी उभ्या असणा-या सह-प्रवाशांनी त्या महिलेच्या तोंडावर पाणी मारुन व इतर उपाय करुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्याचवेळी योगायोगाने तेथून जात असलेल्या महानगरपालिकेच्या सहार आरोग्य केंद्रातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी गायकवाड यांचे तेथील गर्दीकडे लक्ष गेले. त्यांनी जवळ येऊन बघितले असता, तिथे बेशुद्ध पडलेली महिला आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत असलेले सह-प्रवासी त्यांना दिसले. यानंतर डॉ. माधुरी यांनी महिलेची प्राथमिक तपासणी केली असता नाडी लागत नसल्याचे त्यांना आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी सदर महिलेस तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सीपीआर अंतर्गत रुग्णाच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देण्यासह तोंडावाटे रुग्णाच्या तोंडात अधिक दाबाने हवा फुंकली जाते. यानुसार दोनवेळा सीपीआर दिल्यानंतर सदर रुग्ण महिला काही प्रमाणात शुद्धीवर आली. याप्रसंगी त्या ठिकाणी असणा-या डॉ. प्राही नायक आणि डॉ. चंद्रकांता यांनी देखील याकामी मोलाची मदत केली. तोवर सह-प्रवाशांनी बोलविलेली रुग्णवाहिका आली होती. ज्यामधून सदर महिलेस तेथून जवळच असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले व पुढील वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. आता वैद्यकीय उपचारानंतर सदर रुग्ण महिलेची तब्ब्येत ठिक आहे. प्रसंगवधान राखून रुग्ण महिलेवर तात्काळ उपचार करणा-या डॉ. माधुरी यांचे त्या महिलेच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत. तसेच मेट्रो रेल्वेच्या संबंधितांनी दूरध्वनी करुन डॉ. माधुरी यांचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले आहेत. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉक्टर संजीव कुमार आणि महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनीही वेळच्यावेळी तात्काळ सीपीआर देऊन रुग्ण महिलेचे प्राण वाचविणा-या डॉ. माधुरी यांचे कौतुक केले आहे.

ह्दयविकार टाळण्यासाठी काय कराल…

ज्यांना मधुमेह किंवा रक्तदाब आहे, त्यांनी याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. वेळच्यावेळी जेवण, संतुलित आहार, पुरेशी झोप, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुरेसा व्यायाम, यासारख्या चांगल्या सवयी आपण सर्वांनीच अंगी बाणवणे अत्यंत गरजेचे आहे. या चांगल्या सवयी केवळ आपल्यापुरता मर्यादित न ठेवता, त्या अंगिकारण्यासाठी आपल्या कुटुंबियांना – आप्तांना – मित्रांना देखील सातत्याने सकारात्मकरित्या प्रेरित करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सार्वजनिक आरोग्य खात्याच्या संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी कळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.