सध्या वयाच्या तिशी, चाळीशीतच लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ लागला आहे. याबाबत वैद्यकीय क्षेत्रांतून चिंता व्यक्त होत आहे. त्यातच कोरोनाची बाधा झाल्यानंतर वर्षभरानंतर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस दिसून येत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. कोरोनाकाळात लोकांचे मानसिक खच्चीकरण झाले. एखाद्या माणसाला हृदयविकाराचा झटका येण्यामागे हृदयातील ब्लॉकेजेस कारणीभूत असतात. अॅथेरोस्क्लेरॉसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्रक्रियेमुळे धमन्यांमध्ये हे अडथळे तयार होतात.
या प्रक्रियेमध्ये चरबी, कॉलेस्ट्रोल आदींचा थर धमन्यांच्या भिंतीवर साचत जातो. या सर्व घटकांमुळे अग्रेसिव्ह अॅथेरोस्क्लेरॉटिक आजार होतो. तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यांमागे हे कारण प्रामुख्याने दिसून आले आहे. कोरोनापूर्वी तरुणांमधील वाढते हृदयविकाराचे प्रमाण हे हृदयरोगतज्ज्ञांसाठी चिंतेचे कारण होते. आता कोरोनाची बाधा झाल्यानंतर वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर हृदयाशी निगडीत रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस दिसून येत असल्याची माहिती मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाच्या कार्डिओ थोरॅसिक एण्ड व्हॅस्क्युलर सर्जरी विभागाच्या हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनिषा हिंदुजा यांनी दिली.
तणावामुळे हृदय बिघडतेय…
- कोरोनाच्या संसर्गानंतर शरीर पूर्णपणे बरे व्हायला बराच वेळ घेते. या काळातही आर्थिक आणि सामाजिक घटकांमुळे लोकांमध्ये ताणतणाव वाढत आहे. या तणावाचा परिणाम शरिरावर होत असल्याने हृदय बिघडत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी व्यक्त केले.
- अचानक जास्त व्यायाम करु नका. तंदुरुस्त असण्यापेक्षा तंदुरुस्त दिसण्याच्या स्पर्धेत अनेक तरुण मुले-मुली काही व्यायामाला सुरुवात करतात. आयुष्यात कधीही व्यायाम न करणारी किंवा प्रदीर्घ काळासाठी व्यायाम न करणारी माणसे अचानक व्यायाम करु लागतात. अचानक मोठ्या प्रमाणावर होणारी हालचाल शरीराला झेपत नाही.
आहार सांभाळा
- शरीराची काळजी घेण्यासाठी सकस आहाराचे सेवन करणे जरुरीचे असते. फायबर, प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्सयुक्त आहारांचे सेवन करा.
- मद्यपान आणि धुम्रपान टाळा.
- व्यायाम नियमित करा. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायामाला सुरुवात करा. व्यायामाचे प्रकार आणि तास वाढवण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- तणावमुक्त जगण्यासाठी छंद जोपासा.