सोन्याचे खोटे नाणे देऊन सोनारांना गंडवणाऱ्या महिलेला कुर्ला पोलिसांनी दहिसर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही गृहिणी असून तिने मुंबईतील अनेक सोनारांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आशा हितेश लोढा उर्फ नेत्रा बोकाडिया (३४) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून त्रिवेणी संगम, तावडेवाडी सिटी, दहिसर पूर्व येथे ती राहत होती.
( हेही वाचा : जागतिक हृदय दिन : आपल्या आरोग्याबद्दल प्रत्येकाने सजग आणि जागृत राहण्याची गरज! )
कुर्ला पश्चिम न्यू मिल रोड येथील पी.पी .ज्वेलर्सचे मालक शैलेश प्रकाश जैन यांच्या दुकानात जुलै महिन्यात ही महिला आली होती, तिने अर्धा तोळे वजनाचे नाणे देऊन ते सोन्याचे असल्याचे सांगितले. मुलगा हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यामुळे पैशांची गरज असल्याचे सांगून सोनार जैन यांच्याकडून पैसे घेऊन ही महिला निघून गेली.
काही दिवसांनी सोनार जैन यांनी नाणे तपासले असता ते नाणे खोटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जैन यांनी याप्रकरणी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या महिलेचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नंदुलाल पाटील, पोलीस हवालदार गोंड ,लांडगे, चव्हाण, साबळे, इंगळे, यांनी तपास सुरु केला.
तपास सुरु असताना या महिलेने अनेक सोनारांची याप्रकारे फसवणूक केल्याचे समोर आले, दरम्यान तपास पथकाला या महिलेचा मोबाईल क्रमांक सापडला. या मोबाईलवरून पोलिसांनी तिचा शोध घेतला असता सदर महिला ही दहिसर पूर्व येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तपास पथकाने दहिसर येथून या महिलेला ताब्यात घेऊन कुर्ला येथे आणण्यात आले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली देत यापूर्वी तिने अशाप्रकारे अनेक सोनारांची फसवणूक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र होव्हळ यांनी दिली आहे. या महिलेचे खरे नाव आशा हितेश लोढा असे असून ती नेत्रा बोकाडिया नाव सांगून सोनारांची फसवणूक करीत होती असे होव्हळ यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community