कोरोना काळात १८ ट्रॅव्हलर्स बस गाड्या खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यातील जी बस गाडी १२ ते १७ लाखांची होती, ती कोरोना काळात १ कोटी ९४ लाख रुपयांत महाविकास आघाडी सरकारने खरेदी केली. विशेष म्हणजे त्यावेळी या व्यवहाराला वित्त विभागाने विरोधही केला होता. तरीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्या वाहनांची किंमत जास्तीत जास्त त्या वाहनात बदल करूनही ३० लाख रुपये होणे अपेक्षित होते, ती बस गाडी २ कोटींच्या भावात का खरेदी करण्यात आली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवहाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
कशी वाढली बस गाडीची किंमत?
महाविकास आघाडी सरकारने फोर्स ट्रॅव्हलरच्या बस गाड्या खरेदी केल्या. त्यावेळी एक गाडीची किंमत १२ ते १७ लाख रुपये होती, आपत्ती व्यवस्थापनाने त्यात हातोडा, टॉर्च, पाण्याचा फवारा आणि कटर बसवला, या सर्व वस्तूंची किंमत साधारण ३ लाख रुपये होऊ शकते. म्हणजे या सर्व वस्तूंसह एका गाडीची किंमत २० लाख असू शकते, इतर सोयी सुविधा आणि सजावटीसह गाडीची किंमत ३० लाख होईल. पण सरकारने एका गाडीसाठी १ कोटी ९५ लाख रुपये मोजले. तसेच ४ वर्षांसाठी देखभाल खर्च म्हणून ७४ लाख ६० हजार रुपये खर्च केला.
काय म्हणणे आहे विजय वडेट्टीवारांचे?
यासंबंधी बोलताना तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, २०१४ च्या युती सरकारच्या काळात ज्या किमतीत गद्य खरेदी केल्या, त्याच थोड्या बहुत किमतीत आम्ही गाड्या खरेदी केल्या. त्यावेळी फडणवीस सरकारने एक गाडी १ कोटी ७४ लाख रुपयात अशा ९ गाड्या खरेदी केल्या होत्या, तोच आधार घेत आम्हीही ४८ कोटीत १८ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याची चौकशी करायला आमची हरकत नाही.
Join Our WhatsApp Community