देशातील वाहन अपघातांच्या वाढत्या घटनांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आता केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. सर्व चारचाकी गाड्यांमध्ये सहा एअरबॅग्सची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील वर्षी 1 ऑक्टोबरपासून ही सक्ती अंमलात आणणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे.
पुढच्या वर्षापासून अंमलबजावणी
अलिकडेच प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर केंद्र सरकारने कारमधील मागच्या सीटवर बसणा-या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणे बंधनकारक केले होते. त्यानंतर आता कारमध्ये 6 एअरबॅग्सच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार होती पण आता ही अंमलबजावणी एक वर्ष पुढे ढकलण्यात आली असून 1 ऑक्टोबर 2023 पासून हा नियम लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः पुणे विद्यापीठाचा मनमानी कारभार, घरातील किरकोळ वस्तूंसाठी लाखो रुपयांचा खर्च)
कंपन्यांमध्ये नाराजी
एअरबॅग सक्तीच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून कार उत्पादक कंपन्यांमध्ये नाराजी आहे. सध्या देशात दोन एअरबॅग्सची सक्ती असून त्यांची संख्या वाढून सहा झाल्याने कारच्या किंमती सुद्धा वाढणार आहेत. यामुळे गाड्यांच्या किंमती या 50 ते 60 हजार रुपयांनी वाढणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. पण केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला असून कंपन्यांना 1 वर्षांपर्यंतची मुभा दिली आहे.
यासाठी एम 1 ही पॅसेंजर कारची कॅटेगरी ठरवण्यात आली आहे. 2020 मध्ये झालेल्या बहुतांश कार अपघातांमध्ये जर 6 एअरबॅग्स असत्या तर 13 हजारांहून अधिक लोकांचे प्राण वाचू शकले असते, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community