मुंबई महापालिका कर्मचा-यांना 22 हजार 500 रुपये बोनस म्हणून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोनसच्या मागणीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच आरोग्य सेविकांनाही एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका कर्मचा-यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
२२ हजार ५०० रुपये बोनस
मुंबई महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी नुकतीच बोनससंदर्भात चर्चा करण्यासाठी कृती समितीची बैठक बोलावली होती. त्यात २५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी कर्मचारी संघटना आणि पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत २२ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय आरोग्य सेविकांनाही एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
ठाकरेंनी दिले होते २० हजार रुपये
गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस दिला होता. त्यामुळे नवे मुख्यमंत्री किती बोनस वाढवून देतात, याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. कर्मचाऱ्यांच्या मागणीचा मान राखत शिंदे यांनी ठाकरेंपेक्षा २ हजार ५०० रुपये अधिकचा बोनस जाहीर केला आहे.
Join Our WhatsApp Community