डाॅक्टर रुग्णांना लिहून देणा-या प्रिस्क्रिप्शनवर जे काही लिहितात ते आपल्या समजण्यापलिकडचे असते. कोणाचं अक्षर समजत नसेल तर तू काय डाॅक्टरांसारखं लिहितोस काय असा प्रश्न हमखास विचारला जातो. पण अलिकडच्या काळात सोशल मीडियावर अतिशय सुबक हस्ताक्षराचे चित्र व्हायरल होत आहे. हे अक्षर केरळचे डाॅक्टर नितीन नारायणन यांचे आहे आणि ते कोणत्याही रुग्णाला वाचता येईल. हे डाॅक्टर केरळच्या पलक्कड येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करतात, बेन्सी एसडी यांनी फेसबुकवर शेअर केल्यानंतर हा फोटो मागच्या आठवड्यात व्हायरल झाला होता.
या डाॅक्टरांनी आपल्या रुग्णाला प्रिस्क्रीप्शन मोठ्या सुवाच्य अक्षरात लिहून दिले, ज्यामुळे प्रिस्क्रिप्शन वाचण्यास खूप सोपे झाले आणि त्या रुग्णालादेखील समजले. डाॅक्टर नारायणन हे गेल्या तीन वर्षांपासून सीएचसीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी लहान वयातच चांगले हस्ताक्षर कौशल्य विकसित केले होते. माझ्या हस्ताक्षराच्या सरावाने मला मदत झाली आणि माझा अभ्यास पूर्ण केल्यानंतरही मी लेखन शैली टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला, असे डाॅक्टर नारायणन यांनी सांगितले.
( हेही वाचा: रेल्वेच्या UTS ॲपला प्रवाशांची पसंती; दुप्पट तिकीट बुकिंग )
प्रिस्क्रिप्शन स्पष्टपणे लिहिण्याचा माझा प्रयत्न
डाॅक्टर नारायणन यांनी त्रिशूर मेडिकल काॅलेजमधून एमबीबीएस आणि जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अॅंड रिसर्चमधून एमडी पूर्ण केले. एशियानेटशी बोलताना डाॅक्टर म्हणाले, मी माझी प्रिस्क्रिप्शन ठळक अक्षरात लिहितो. इतर डाॅक्टर अशा पद्धतीने कळणार नाही असे लिहितात. याचे कारण डाॅक्टरांनाच माहिती असावे. मी व्यस्त असतानाही प्रिस्क्रिप्शन स्पष्टपणे लिहिण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. त्यामुळे रुग्ण अनेकदा या डाॅक्टरांचे कौतुक करताना दिसतात.
Join Our WhatsApp Community