मुंबईतील दुकानांच्या पाट्या देवनागरी भाषेत अर्थात मराठी भाषेत करण्यासाठी सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना आजवर देण्यात आलेली मुदतवाढ आता ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. मात्र, महापालिकेने केलेल्या सर्वेमध्ये एकूण दुकानांच्या पाट्यांच्या तुलनेत आजवर केवळ ९७ हजार दुकानांनी पाट्या मराठीत केल्या आहेत. परंतु आजही एक लाखांहून अधिक पाट्यां या देवनागरी भाषेत बनवल्या गेल्या नसून पुढील आठवड्यापासून महापालिका कारवाईचा बडगा उगारते की याला पुन्हा मुदतवाढ देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
( हेही वाचा : पुढील तीन महिन्यांत धारावीच्या पुनर्विकासाला सुरुवात करणार; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही )
मुंबईतील मराठी नामफलकासाठी मद्य विक्रीची दुकाने व मद्य पुरविण्यात येणाऱ्या आस्थापनांव्यतिरिक्त इतर दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाबाबत अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्तता करण्यासाठी ३१ मे २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. जर ३१ मे पर्यंत या पाट्या मराठीतून न केल्यास पुढील १५ दिवसांत सर्व्हे करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. व्यावसायिकांच्या मागणीनंतर ही मुदत वाढवून देत ३० जून २०२२ पर्यंत करण्यात आली होती, परंतु त्यानंतर ही मुदतवाढ दुकानदार आणि व्यावसायिकांच्या विनंतीनंतर ३० सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.
निम्म्याच दुकानाच्या पाट्या मराठीत
परंतु ३० सप्टेंबरपर्यंत मुंबईतील केवळ निम्म्याच दुकानाच्या पाट्या मराठीत झाल्याचे दिसून येत आहे. ही मुदतवाढ ३० सप्टेंबरला संपुष्टात येत असल्याने महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागाच्या माध्यमातन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे पुढील कार्यवाहीकरता अहवाल पाठवला आहे. यामुळे पुढील कार्यवाही कशाप्रकारे करायची किंवा कसे अशी विचारणा विभागाने केल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या निरिक्षकांनी केलेल्या सर्वेमध्ये मुंबईत असलेल्या एकूण २ लाख दुकानांच्या पाट्यांपैंकी केवळ ४८ टक्के म्हणजे ९७ हजार दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेत असल्याचे आढळून आले. या विभागाने मुख्य रस्त्यांच्या प्रदर्शनी भागांमध्ये हा सर्वे केला आहे. त्यात ९७ हजार दुकानांच्या पाट्या मराठीत ठळक अक्षरात असल्याचे दिसून आले आहे.
यासंदर्भात उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मराठी पाटया करण्यासाठी दिलेली मुदत संपुष्टात आल्याने प्रशासन पुढील कार्यवाही करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले. पुढील आठवड्यात याबाबतची कार्यवाही होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community