मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन जवळपास तीन महिने उलटले, तरी एकनाथ शिंदे अजून वर्षा बंगल्यावर रहायला गेलेले नाहीत. त्यामुळे ‘वर्षा’चे कधी होणार एकनाथ, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. ‘हिंदुस्थान पोस्ट’ला याचे उत्तर सापडले असून, दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे वर्षावर अधिकृतपणे वर्षा या शासकीय निवासस्थानी रहायला जाणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
( हेही वाचा : पुढील तीन महिन्यांत धारावीच्या पुनर्विकासाला सुरुवात करणार; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही )
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना विहित कार्यकाळासाठी शासकीय बंगला दिला जातो. मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून वर्षा बंगला राखीव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामुळे ‘वर्षा’ हे राज्यातील सत्ताकारणाचे प्रमुख केंद्र मानले जाते. मात्र, एकनाथ शिंदे आजही ‘नंदनवन’ आणि ‘अग्रदूत’ या बंगल्यावरून कारभार पाहत आहेत. दांडगा जनसंपर्क असलेल्या शिंदेंना भेटण्यासाठी दररोज शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते येत असतात. शिवाय महामंडळांचे वाटप, दुसरा मंत्रिमंडळ विस्तार आणि दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आमदारांची ये-जाही वाढली आहे. त्यामुळे या सर्वांची उठबस करण्यास जागा कमी पडत असल्याने बंगल्यांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे.
मागच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांना ‘नंदनवन’ बंगला देण्यात आला होता. तो आणि त्याच्या शेजारी असलेला ‘अग्रदूत’ बंगलाही सध्या त्यांच्याकडे आहे. परंतु, वर्षा निवासस्थानच्या भोवताली असलेली सुरक्षा या बंगल्यांच्या आजुबाजूला नाही. शिवाय दोन्ही बंगल्यांचा आकारही वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कधी वर्षावर रहायला जाणार, याकडे त्यांच्या ताफ्यातील कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे. सध्या महत्त्वाच्या बैठकांकरिता एकनाथ शिंदे वर्षा बंगल्याचा वापर करतात. गणेशोत्सव काळात शिंदेंसह त्यांच्या कुटुंबियांची वर्षावर सातत्याने ये-जा असायची. परंतु, त्यांनी वास्तव्यासाठी या बंगल्याचा वापर अद्याप सुरू केलेला नाही. दिवाळीच्या मुहुर्तावर ते वर्षावर रहायला जाणार आहेत.
कारणे काय?
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत अंतिम निर्णय न झाल्याने एकनाथ शिंदे अद्याप वर्षावर रहायला गेले नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र, डागडुजीचे काम पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी अधिकृत प्रवेश केला नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे काम आता अंतिम टप्यात आले आहे. बारीक-सारिक कामे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे दिवाळीचा मुहुर्त निश्चित झाल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community