खोल समुद्रात मासेमारी करताना भरकटलेल्या दोन बोटींना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. या बोटींवरील एकूण 16 खलाशांना पाकिस्तानने अटक केली आहे. त्यातील 7 जण महाराष्ट्रातील पालघर येथील असल्याचे समोर आले आहे. पालघरमधील मच्छिमार संघटनेने यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालघरमधील मच्छिमार संघटनेने दिली आहे.
पालघर जिल्ह्यातील खलाशी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी गुजरातमधील ओखा आणि पोरबंदर या भागात जात असतात. जवळपास दहा ते बारा हजार मच्छिमार कामगार पालघर जिल्ह्यातून या भागांत रोजगारासाठी जातात. याच भागातील दोन बोटी भरकटल्याने पाकिस्तानच्या हद्दीत गेल्या. त्यामुळे या बोटींवरील एकूण सोळा मच्छीमार खलाशी मजूर यांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. यामधील सात खलाशी मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा: सर्वसामान्यांना महागाईचा झटका; CNG-PNG च्या दरात वाढ! )
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पालघरमधील 7 खलाशांची नावे
- नवशा महाद्या भिमरा
- सरित उंबरसाडा
- विजय नागवंशी
- जयराम ठाकर
- उमजी पाडवी
- विनोद कोल
- कृष्णा बुजड