राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह तिघांवर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते. या वादग्रस्त विधानासंदर्भात चेंबूर येथील सामाजिक कार्यकर्ते ललीतकुमार टेकचंदानी यांनी भुजबळ यांच्या व्हाट्सअॅप क्रमांक असलेल्या मोबाईलवर दोन व्हिडीओ पाठवले होते.भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान केल्याचे ते व्हिडीओ होते.
या दरम्यान ललीतकुमार टेकचंदानी यांना शुक्रवारी दुपारी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला, फोन करणाऱ्या व्यक्तीने ‘तू भुजबळांना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन तुझ्यावर गोळ्या घालतो’ या आशयाची जीवे मारण्याची धमकी दिली. ललीतकुमार टेकचंदानी यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केले, परंतु दुसऱ्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीने कॉल करून पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन तुझ्या हत्येसाठी बाहेरून दुबई येथून माणसे पाठवतो अशी धमकी दिली. ललीतकुमार टेकचंदानी यांनी तत्काळ चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी छगन भुजबळ आणि दोन अनोळखी इसम असे तिघांविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community