शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्याची लगबग सुरु!

132

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणार असून या मेळाव्याची तयारीला सुरुवात झाली आहे. या मेळाव्याकरता शिवाजीपार्कच्या चारही बाजुंना मजबूत लोखंडी पाईपच्या आधारे बांबू बांधले जात आहे. त्यामुळे शिवाजीपार्कवर लोखंडीपाईपच्या आधारे बांबूंची तटबंदी तयार करत व्यासपीठासह तर आसन व्यवस्थेच्या सभोवतालच्या बांबूची उभारणी केली जात आहे.

( हेही वाचा : कोस्टल रोड प्रकल्पाबाबत महापालिकेला न्यायालयाचा दिलासा : आता थांबा नाही, तर पुढे चला!)

शिवाजीपार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून उध्दव ठाकरे आणि शिंदे गटामध्ये निर्माण झालेल्या वादावर अखेर न्यायालयाने तोडगा काढत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी देण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानुसार २६ सप्टेंबर २०२२ रोजी महापालिकेच्यावतीने शिवसेनेला शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे. शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्या नावावर ही परवानगी देण्यात आली असून या परवानगीची प्रत शिवसेनेच्यावतीने प्रविण पंडित यांनी स्वीकारली आहे.

शिवसेनेला १८ अटींसापेक्ष ही परवानगी दिली असून यामध्ये वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांची परवानगी बंधनकारक म्हटली आहे. तसेच अर्जदाराला मुंबई अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्रही सादर करणे बंधनकारक असल्याचे नमुद केले आहे. यासाठी २० हजार रुपये अनामत शुल्क आणि १२५० अधिक १८ टक्के जीएसटी हे परवाना शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. रात्री दहा नंतर या मेळाव्याला परवानगी नसेल,असेही नमुद केले आहे. कार्यक्रम संपल्यानंतर मैदान पूर्वव्रत स्थितीत करून देण्याची अट घालण्यात आली असून मैदानाचे कोणतेही नुकसान झाल्यास अथवा नियमांचे उल्लंघन झाल्यास २० हजार रुपयांच्या अनामत रक्कम जप्त करून पुढील वर्षी यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली जाणार नाही,असेही महापालिकेने आपल्या परवानगीत नमुद केले आहे.

मात्र, येत्या बुधवारी होणाऱ्या या मेळाव्यासाठी शनिवारपासूनच शिवाजीपार्कवर बांबू उभारण्यास सुरुवात झालेली आहे. सर्व प्रकारच्या परवानगीनंतर शिवाजीपार्कवर व्यासपीठासह इतर ठिकाणी बांबू उभारण्यात येत असून प्रारंभी शनिवारी शिवाजीपार्कच्या सभोवताली बांबू बांधले जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी मुख्य लोखंडी पाईपला बांबू बांधून एकप्रकारे मजबूत तटबंदी तयार केली जात असल्याचे पहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.