मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, गुप्तचर यंत्रणेची माहिती

151

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आत्मघातकी स्फोट घडवण्याचा कट रचल्याची गुप्तचर विभागाला माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दुस-यांदा धमकी

एका निनावी फोनच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी सुद्धा नक्षलींकडून मुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ही धमकी देण्यात आली आहे. आषाढी वारीच्या वेळीस मुख्यमंत्र्यांना अशाचप्रकारे धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांविरोधी केलेल्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून सूड उगवण्याच्या हेतूने ही धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.

सुरक्षेत वाढ होणार

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत असून वर्षा निवासस्थान,मुख्यमंत्र्यांचे ठाण्यातील राहते घर आणि नंदनवन येथील सुरक्षेत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबतचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पीएफआयवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे सुद्धा ही धमकी देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाकडून घेण्यात येणा-या दसरा मेळाव्यात देखील एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.