रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निनावी फोनच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर संघटनांनी दिली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान याबाबत पोलिसांकडून तपापस करण्यात येत असून मुख्यमंत्र्यांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. याबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मी धमक्यांना भीक घालत नाही
यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या अनेकदा आल्या आहेत. पण मी माझं काम करत राहिलो आहे. मी त्या धमक्यांची पर्वा केली नाही, कधी त्यांना भीकही घातली नाही आणि माझ्या कामात कुठलाही खंड पडू दिला नाही. त्यामुळे या सगळ्याचा माझ्या कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्यामुळे या धमक्यांकडे मी लक्ष देत नाही, मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी या धमकीचा समाचार घेतला आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, गुप्तचर यंत्रणेची माहिती)
गृहविभाग आणि गृहमंत्री सक्षम
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहविभाग आणि पोलिस सक्षम असून अशा धमक्या देणा-यांचा ते योग्य तो बंदोबस्त करतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
दुस-यांदा धमकी
एका निनावी फोनच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी सुद्धा नक्षलींकडून मुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ही धमकी देण्यात आली आहे. आषाढी वारीच्या वेळीस मुख्यमंत्र्यांना अशाचप्रकारे धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना नक्षलवाद्यांविरोधी केलेल्या कारवाईत अनेक नक्षलवादी मारले गेले होते. त्यामुळे नक्षलवाद्यांकडून सूड उगवण्याच्या हेतूने ही धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community