कर्जबाजारी झाल्यामुळे पत्नी आणि मुलांना विष देऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गोवंडीतील शिवाजी नगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शकील खान (३४) असे पत्नी मुलांना विष देऊन आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
गोवंडी शिवाजी नगर येथील इंदिरा नगर चाळ या ठिकाणी शकील खान हा पत्नी राजिया मुले अतिका आणि सर्फराज यांच्यासह वास्तव्यास होता. शकील हा कर्जबाजारी झाला होता. त्यातून त्याला नैराश्य आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवारी दुपारी त्याने शितपेयातून पत्नी आणि मुलांना विष दिले. त्यानंतर त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला. शिवाजी नगर पोलिसांनी याप्रकरणी मृत शकील याच्याविरोधात पत्नी, मुलांची विष देऊन हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवण्यात आल्याची माहिती शिवाजी नगर पोलीसांनी दिली.
( हेही वाचा: PFI Latest Update: शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण; PFI चा मोठा कट उघडकीस )
Join Our WhatsApp Community