राज्यस्तरीय 34वी तायक्वांदो ज्युनिअर आणि सिनियर गटातील स्पर्धा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सावरकर तायक्वांदो अकॅडमीतर्फे अभिजीत पाटील, तनवीर राजे, मोर्यांश मेहता आणि इशा शहा या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात अभिजीत पाटील, तनवीर राजे, मोर्यांश मेहता आणि इशा शहा या चारही स्पर्धकांनी सुवर्ण पदक पटकावले आहे.
विशेष म्हणजे सुवर्ण पदकाची कमाई केलेला अभिजीत पाटील हा निवड चाचणी स्पर्धा खेळत असताना, त्याच्या अंगठ्याला जोरात मार बसला आणि त्याला असह्य वेदना सुरु झाल्या. त्यावेळी होणा-या वेदनांकडे लक्ष न देता अभिजीत पाटीलने ही स्पर्धा जिंकली आणि त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
डाॅक्टरांनी अंगठा हलवण्यासही केला होता मज्जाव
स्पर्धेनंतर रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता, डाॅक्टरांनी अभिजीत पाटीलचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. अंगठ्याला दीड महिन्यासाठी प्लॅस्टर करण्याचे डाॅक्टरांनी सुचवले. तसेच अंगठ्याची हालचाल करण्यास मज्जावही केला. परंतु जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाल्यानंतर मिळालेली संधी गमावणे अभिजीतला मान्य नव्हते. त्याने रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर प्लॅस्टर काढून टाकले आणि तो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सज्ज झाला.
सुवर्ण पदकाला गवसणी घालण्यासाठी अभिजीतला चार स्पर्धा खेळाव्या लागल्या. उप उपांत्य फेरी, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी. या चारही स्पर्धेत अभिजीतने आपले काैशल्य पणाला लावले. प्रत्येक स्पर्धेत तीन फे-या असतात. या प्रत्येक फेरीमध्ये असंख्य वेदना होऊनही त्याने त्या अजिबात चेह-यावर न दाखवता अंतिम फेरी जिंकत, सुवर्णपदकाची कमाई केली.
( हेही वाचा: मंगळयान मिशन संपुष्टात, 8 वर्षानंतर मंगळयानाचे इंधन संपले, बॅटरीही डाऊन )
वीर सावरकर स्मारकात होणार सत्कार
अभिजीतने दाखवलेल्या साहसामुळे त्याला 4 ऑक्टोबर 2022 ला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शस्त्रपुजनाच्या कार्यक्रमावेळी, कलांगण संगीत विद्यालयातर्फे 1 हजार रुपयांचे रोख बक्षिस आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, सावरकर तायक्वांदो अकॅडमीतर्फे अभिजीतला 10 हजार रुपयांचे रोख बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community