रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील पाभरे गावातील रानात चराईसाठी गेलेल्या जनावरांवर बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. रात्री घरातील प्रांगणांमधील कुत्र्यांना बिबट्या फस्त करतो. जनावरांवरील वाढत्या हल्ल्यांमागे बिबट्याचे जंगलातील तृणभक्षक प्राण्यांचे घटते प्रमाण कारणीभूत असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासकांनी दिली. रत्नागिरीतील जंगलात ससे आणि रानडुक्करांच्या शिकारी वाढल्या आहेत. लपून शिकारी होत असल्याने बिबट्याचे जंगलातील भक्ष्य नाहीसे होत आहे. त्यामुळे रानात चराईसाठी आलेल्या गुरांना बिबट्या भक्ष्य करु लागला आहे.
सकाळी गुरांवर बिबट्या करतो हल्ले
पाभरे गावातील बामणेवाडी, सालकाची वाडी या भागांत बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्या सकाळी ८ ते ९ दरम्यान रानात चरायला आलेल्या जनावरांवर हल्ला करतो. रात्री घरातील प्रांगणात शिरून कुत्र्यांची शिकार करतो. पाभरे गावात आता कुत्रेच शिल्लक राहिलेले नाहीत, अशी माहिती गणपत बामणे यांनी दिली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासून रानात चराईसाठी गेलेल्या जनावरांवर बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. गेल्या महिन्यात २४ सप्टेंबरला बामणेवाडीतील सहदेव बामणे यांच्या बैलाच्या पाडाला बिबट्याने मारले. सोमवारी सकाळी नऊ वाजता सुनंदा मोहिते यांच्या गायीला बिबट्याने मारले. पाभरे शेजारील कुटगिरी गावात प्रत्यक्षदर्शीसमोरच बिबट्या बैलाला घेऊन गेला. या सर्व घटना रानातच चराईच्या वेळी घडल्या. रात्री बिबट्या हमखास मानवी वस्तीजवळ दिसून येतो.
(हेही वाचा ‘काश्मीर फाईल्स’नंतर आता गांधी फाईल्स… गांधी हत्येमागील सत्य उलगडणार?)
गावकऱ्यांची मागणी
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिकांना आता लहान मुलांवर बिबट्याचे हल्ले वाढतील अशी भीती सतावू लागली आहे. गुरे मारल्यानंतर वनविभागाकडून पंचनामा होत आहे. प्रत्यक्षात वनविभागाने टेहाळणी पथकाच्या मदतीने रात्री आणि सकाळी मानवी वस्तीला भेट द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community