रेशनकार्ड धारकांना राज्य शासनाने दिवाळी भेट दिली आहे. रवा, चणाडाळ, साखर आणि तेल (प्रत्येकी एक किलो) केवळ शंभर रुपयांत देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यासह नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती देण्यासाठी सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.
( हेही वाचा: धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला ‘या’ तारखेपर्यंत सादर करावी लागणार कागदपत्रे )
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती
- भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी या योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
- उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ८ दुष्काळी तालुक्यांना याचा फायदा होणार आहे.