आरेत चार वर्षांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

213

आरेत बिबट्याने चार वर्षांच्या मुलावर हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. हिमांशू यादव या चार वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. आरेत यंदाच्या वर्षातील हा पहिला बिबट्याचा हल्ला आहे.

( हेही वाचा : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला ९,२७९ कोटींची सुधारित मान्यता)

आरे दुग्ध व्यवसायातील आदर्श नगर परिसरात ही घटना घडली. सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास बिबट्याने हिमांशुवर हल्ला केला. हिमांशुला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हिमांशूची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने हल्ला झालेल्या ठिकाणी दोन कॅमेरा ट्रेप लावले आहेत. याआधीही काही वर्षांपूर्वी आदर्श नगर येथे बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला होता.

कसा झाला हल्ला?

हिमांशू आपल्या वडिलांसह रात्री रस्त्यावर चालत होता. त्यावेळी मध्येच बिबट्याने हल्ला केला. मात्र वडिलांच्या प्रसंगावधानतेमुळे हिमांशू वाचला. हल्ल्यात हिमांशूच्या पाठीला इजा झाली, त्याला किमान दोन दिवस उपचारांसाठी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

वनाधिका-यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. आदर्श नगर परिसरात वनविभागाकडून जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
संतोष सस्ते, उपवनसंरक्षक, ठाणे प्रादेशिक (मुंबई)

जंगलात वावरताना काय काळजी घ्याल

  • रात्री आणि भल्या पहाटे जंगलात जाणे टाळा
  • काही अपरिहार्य कारणास्तव घराबाहेर जायचे असल्यास गर्दीसह बाहेर पडा
  • बाहेर मोबाईलवर गाणे लावा तसेच हातात मोबाईल टॉर्च ठेवा
  • लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. बिबट्या डोळ्यांना समांतर दिसणा-या भक्ष्याची शिकार करणे पसंत करतो. भटके कुत्रे बिबट्याचे आवडते खाद्य असते. कित्येकदा भक्ष्य समजून बिबट्या लहान मुलांवर हल्ला करतो
  • कच-याची विल्हेवाट लावा
  • जंगलात प्रातःविधीसाठी जाऊ नका.
  • बिबट्याचा वावर असलेल्या भागांत पुरेशी वीजेची सोय असावी

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.