शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला उधाण आले असून या चर्चेवर नार्वेकर यांनी शिवाजीपार्क येथील शिवसेना मेळाव्याच्या तयारीची पाहणी करत पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे गटाच्या उभारणीमध्ये नार्वेकर यांनी चाणक्याची भूमिका बजावली असल्याचे बोलले जात असून शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी नार्वेकर यांनी वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मनधरणी केली होती. परंतु त्यांच्या मनधरणीनंतरही उध्दव ठाकरे हे भाजपसोबत युती करायला तयार नसल्याने नार्वेकर यांनी शिंदे गटाला बाजूला करण्यात मोठा हातभार लावला असल्याचे माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
( हेही वाचा : उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना संजीवनी मिळणार)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची सेवा करणाऱ्या चंपासिंह थापा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश दिल्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारीत होऊ लागल्या. परंतु या बातम्यांचे नाही अद्यापही नार्वेकर यांनी खंडन केले नाही. मात्र, शिवाजीपार्क येथील शिवसेना मेळाव्याची पाहणी करून आपण उध्दव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच असल्याचे दाखवून दिले. परंतु नार्वेकर हे शिंदे यांच्या संपर्कात असून शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आणि १५ खासदार जाण्यासाठी मदत केल्याचे बोलले जात आहे.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, शिंदे यांच्यासोबत काही आमदार फुटून सुरत गेल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि ठाण्यातील विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक हे गेले होते. विशेष म्हणजे शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांची तिथे जाण्याची हिंमत झाली नाही, तिथे नार्वेकर यांची कशी झाली असा सवाल केला जात असून शिंदे यांच्या संपर्कात असल्याने नार्वेकर यांना हॉटेलपर्यंत प्रवेश दिला असल्याचे बोलले जात आहे. नार्वेकर यांच्या जागी अन्य नेता असता तर त्यांना तिथे प्रवेशही दिला गेला नसता. त्यातच त्यांच्यासोबत असणारे फाटक हे दोन दिवसांनी शिंदे गटा सोबत गेले. त्यामुळे नार्वेकर यांचे शिंदे यांच्यासोबत असलेले संबंध स्पष्ट होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर शिवसेना भाजपची युती व्हावी ही नार्वेकर यांची इच्छा होती, तसेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही नार्वेकर हे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार यावे यासाठी प्रयत्नशील होते. परंतु प्रयत्न करूनही नार्वेकरांना यश न आल्याने त्यांनी शिंदे यांना बाजुला होताना मदत केल्याचे बोलले जात आहे. तसेच आजही ते शिंदे यांच्या संपर्कात असून जर ते शिंदे गटाच्या संपर्कात नसते तर ४० आमदारांपैंकी किमान ५ आमदार तरी ते फोडून पुन्हा शिवसेनेत आणू शकले असते. शिवसेनेचे चाणक्य अशीच नार्वेकर यांची ओळख असून अशक्यही शक्य करणे हेच त्यांचे काम आहे. त्यामुळे शिंदे यांची मनधरणी करायला गेलेल्या नार्वेकर यांना एकाही आमदाराला तसेच खासदाराला परत शिवसेनेत आणता आले नाही तिथेच त्यांचे शिंदे गटासोबतच्या नात्यांमधील संबंध स्पष्ट होतो,असे काही ज्येष्ठ नेत्यांचेही म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community