पालकमंत्र्यांच्या महापालिका आयुक्तांसोबतच्या आढावा बैठकीत भाजपचे माजी नगरसेवक

146

राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता आणि महिला व बालविकास या खात्यांचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी बैठक घेऊन महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला. परंतु या बैठकीला काही आमदार आणि खासदार उपस्थित होते, पण याबरोबरच भाजपचे माजी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, माजी पक्षनेते विनोद मिश्रा आणि माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट हे उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या आढावा बैठकीत भाजपच्या या माजी नगरसेवकांना प्रवेश कसा दिला असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकमंत्र्यांनी या तिन्ही माजी नगरसेवकांना विद्यमान आजी आमदार व खासदारांसमवेत बैठकीत प्रवेश देत त्यांना चर्चेत सहभागी करून घेतल्याने लोढा यांनी पालकमंत्री म्हणून ही बैठक घेतली की आमदार म्हणून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : कुळगांव- बदलापूर नगरपरिषदेला कोविड काळातील खर्चाचे २० कोटी रुपये मिळणार)

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई महानगराची पालक संस्था असलेल्या महानगरपालिकेच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेता यावी, सध्या सुरु असलेले प्रकल्प व योजना यांचा आढावा घेता यावा आणि भविष्यातील दिशा यादृष्टीने मंगलप्रभात लोढा यांनी महानगरपालिका मुख्यालयात ही बैठक बोलावली होती. या बैठकीच्या सुरुवातीला महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सर्व मान्यवरांना महानगरपालिकेची महत्त्वाची व प्राथमिक माहिती दिली. यानंतर अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी मुंबईतील रस्ते व पूल या संबंधीची विकास कामे, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा, मलजल प्रक्रिया केंद्रे इत्यादींबाबत माहिती दिली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणा-या विविध आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये इत्यादींबाबत माहिती दिली. बैठकी दरम्यान अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी सागरी किनारी रस्ता, उद्याने, मैदाने, माहिती तंत्रज्ञान विभाग, शिक्षण विभाग इत्यादींबाबत उपस्थितांना माहिती दिली.

या बैठकी दरम्यान उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्यानंतर अनुक्रमे आमदार विद्या ठाकूर, आमदार पराग अळवणी, राजहंस सिंह, भारती लव्हेकर, प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा यांच्यासह माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.

मुंबईतील विविध कामांच्या दृष्टीने राज्य शासनाच्या स्तरावर समन्वय साधण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांनी प्राधान्याने करावी, असे निर्देश देतानाच यासाठी पालकमंत्री म्हणून जे सहकार्य लागेल, ते निश्चितच केले जाईल, असे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका प्रशासनाला आश्वासन दिले.

त्याचबरोबर या बैठकीला सहआयुक्त (दक्षता) अजीत कुंभार, सह आयुक्त मिलिन सावंत, रमेश पवार, चंद्रशेखर चोरे, रणजित ढाकणे, विजय बालमवार,उप आयुक्त विश्वास शंकरवार, उल्हास महाले यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

दरम्यान पालकमंत्र्यांसमवेतच्या बैठकीला केवळ उपनगरांमधील खासदार आणि आमदारांनाच प्रवेश दिला जाणे अपेक्षित असताना माजी नगरसेवकांनाही बैठकीत प्रवेश देतानाच त्यांना चर्चेतही सहभागी करून घेतल्याने पालकमंत्र्यांच्या या बैठकीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. यापूर्वी उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जेव्हा अशाप्रकारच्या बैठका घेतल्या होत्या, त्यावेळी महापालिका अस्तित्वात असल्याने महापौर, सभागृह नेत्या तसेच स्थायी समिती अध्यक्षांसह विविध समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. परंतु आता महापालिकाच अस्तित्वात नसून माजी नगरसेवकांना पालकमंत्री कसे काय आयुक्तांसोबतच्या अधिकृत बैठकीत सहभागी करून घेतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.