हवाई वाहतूक क्षेत्रातही ‘शिया-सुन्नी’ भेदभाव; राहुल शेवाळेंच्या मध्यस्थीमुळे कंपनी नरमली

188

अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्रातही ‘शिया-सुन्नी’ असा भेदाभेद केला जात असल्याचे समोर आले आहे. ‘शिया-सुन्नी’ भेदभाव करीत एका खासगी हवाई वाहतूक कंपनीच्या मनुष्यबळ प्रशासन अधिकाऱ्याने (एचआर) आपल्याच कंपनीतील वैमानिकाची परदेशात नोकरीची संधी हिरावण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना हा प्रकार कळताच, त्यांनी तातडीने दखल घेत कंपनीच्या वरिष्ठांची कानउघडणी केली. त्यामुळे या कंपनीने नरमाईची भूमिका घेतली.

१५ लाख रुपयांची दंडाची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली

मुंबईत मुख्यालय असलेल्या या विमान कंपनीची स्थिती सध्या बिकट आहे. निम्म्याहून अधिक विमाने उभी असल्याने कर्मचाऱ्यांना ५० टक्के पगारावर काम करावे लागत आहे. त्यामुळे या वरिष्ठ वैमानिकाने (संबंधिताच्या विनंतीवरून नाव गोपनीय ठेवले आहे) अन्य कंपन्यांमध्ये अर्ज करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी त्यांना ब्रिटिश हवाई वाहतूक कंपनीकडून नोकरीची संधी चालून आली. त्यामुळे त्यांनी २२ जुलै २०२२ रोजी राजीनामा दिला. परंतु, कंपनीच्या करारनाम्यानुसार मुदतपूर्व नोकरी सोडण्याची परवानगी नव्हती. मुदतपूर्व नोकरी सोडायची झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) परवानगी आणि त्याने ठरवून दिलेल्या दंडाची रक्कम भरण्याचा नियम करारनाम्यात अंतर्भूत आहे. त्यानुसार त्यांनी सीईओची परवानगी मिळवली. तसेच त्यांनी निश्चित केलेली १५ लाख रुपयांची दंडाची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली.

(हेही वाचा कोणाच्या दसरा मेळाव्याला होणार सर्वाधिक गर्दी? पोलिसांचा सर्व्हे काय सांगतो?)

वैमानिकाला कार्यमुक्त करण्याचे दिले निर्देश

कंपनीला ही रक्कम देण्यासाठी या वैमानिकाने बॅंकेकडून १५ लाखांचे कर्ज घेतले. त्यानंतर पैसे पाठवण्यासाठी एचआरकडे आरटीजीएसची मागणी केली. परंतु, त्याने त्यास नकार दिला. तसेच करारनाम्यानुसार जानेवारी २०२३ पर्यंत कार्यमुक्त करता येणार नाही, अशी तंबीही दिली. वास्तविक सीईओने मंजुरी दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करणे ही एचआरची जबाबदारी असते. पण या कंपनीच्या एचआरने सीईओचे निर्देश ऐकण्यासही नकार दिला. कालांतराने हा प्रकार ‘शिया-सुन्नी’ भेदभावाचा असल्याचे समोर आले. खासदार राहुल शेवाळे यांच्या कानावर ही बाब पडताच त्यांनी तत्काळ दखल घेत कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. तसेच घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा मागोवा घेऊन या वैमानिकाला कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या वैमानिकाला मुक्त भरारी घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.