एकीकडे दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटांत चढाओढ सुरू असतानाच, एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात दाखल झालेल्या रामदास कदम यांचे सुपूत्र अद्याप ठाकरेंच्या युवासेनेत असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नियोजन बैठकीत यावरून प्रचंड गदारोळ झाला असून, पदाधिकाऱ्यांनी वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना धारेवर धरल्याचे कळते.
( हेही वाचा : राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण; भाजपाची टीका)
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेच्या कार्यकारिणीत सिद्धेश कदम सक्रीय होते. मात्र, वडील रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाऊ योगेश आणि स्वतः सिद्धेश शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे सिद्धेश यांचे नाव कार्यकारिणीतून कमी करणे अपेक्षित होते. परंतु, आजपावेतो त्यांचे नाव यादीत कायम आहे. ही बाब विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ऐन नियोजन बैठकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. इतक्या मोठ्या घडामोडी घडल्यानंतरही तुम्ही गाफिल कसे काय राहू शकता, असा जाब त्यांनी सरदेसाई आणि चव्हाण यांना विचारला.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुख, नेते आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या बैठकीत विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे, आमदार विलात पोतनीस यांच्यासह अन्य काही नेत्यांनी कदमांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. रामदास कदम यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटात सामील झाल्यापासून ते शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्यपूर्ण विधाने करीत आहेत. असे असतानाही त्यांचे पूत्र सिद्धेश अद्यापही युवासेनेच्या पदावर कसे, अजून त्यांची हकालपट्टी का केली नाही, असे अनेक सवाल या नेत्यांनी उपस्थित केले होते.
राऊत, अनिल देसाईंनी केली मध्यस्थी
शिवसेनेचे सचिव विनायक राऊत आणि खासदार अनिल देसाई यांनी हा वाद मिटवण्यात पुढाकार घेतला. सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबाही दिला. याउलट वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सिद्धेश कदम यांच्याबाबत युवासेनेकडून मोठा निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे.
तात्काळ हाकालपट्टी करा – पेडणेकर
नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर रामदास कदम यांनी त्यांना मदत केली. त्यानंतरही उद्धव ठाकरे ठाकरेंनी कदम यांना सन्मानाने वागणूक दिली. मात्र, त्यांचे संस्कार ते दाखवत आहेत. मुलगा त्यांना बोलण्यापासून रोखत नसेत, तर सुरज चव्हाण यांनी तात्काळ सिद्धेश कदम यांची हकालपट्टी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.