रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशनच्या कार्यालयात एक फोन करुन अंबानी परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत तपास सुरु केला आहे. मुकेश अंबानी यांच्या अॅंटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास रिलायन्सच्या कार्यालयातील लॅंडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन काॅल आला होता. रिलायन्स हाॅस्पिटलमध्ये बाॅम्बस्फोट करण्याची धमकी या काॅलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांनाही जीवे मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली. या प्रकरणाची दखल डीबी मार्ग पोलिसांनी घेतली असून, त्यांचा तपास सुरु आहे.
( हेही वाचा: निलेश राणे म्हणतात, चलो शिवाजी पार्क, फोटो केला ट्विट! )
याआधीही जीवे मारण्याची धमकी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी या आधीही देण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हाॅस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरुन धमकी देणारा एक फोन काॅल आला होता. याची तक्रार डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला होता. त्यानंतर विष्णू विदू भौमिक या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्या आरोपीचे दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान आहे.
Join Our WhatsApp Community