रामजन्मभूमी समर्थक असलेल्या एका शिया मुस्लीम नेत्याला गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बॉम्बने घर उडवून देण्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याहून कहर म्हणजे या नेत्याचा मुलगा ज्या हवाई वाहतूक कंपनीत काम करतो, तेथील वहाबी ‘एचआर’कडून त्याची मुस्कटदाबी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या कानावर ही बाब पडताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप करीत या नेत्याच्या मुलाचा नोकरीतून कार्यमुक्त होण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
(हेही वाचा – शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू)
वैमानिक म्हणून देश-विदेशात नावलौकिक मिळवलेला हा ज्येष्ठ शिया मुस्लीम नेता सुरुवातीपासूनच हिंदुत्त्ववादी आणि रामजन्मभूमी समर्थक आहे. त्यांनी पॅरिसच्या सॉर्बोन विद्यापीठातून मानविकी आणि समाज कल्याण विषयात पीएचडी संपादन केली आहे. विवेकानंद केंद्राद्वारे आयोजित ‘भारत परिक्रमा-१९९२’मध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या या नेत्याने रामचंद्र दास परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली राम मंदिर आंदोलनात भाग घेतला होता. शिवाय २००४ मध्ये त्यांनी अयोध्येत राम मंदिरावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भारताचे विभाजन, जम्मू आणि काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, कलम ३७० आणि ३५अ, अरब-इस्त्रायल संघर्ष आणि मतभेद, मध्य-पूर्व, उत्तर आफ्रिका आणि इस्लाम या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे.
या नेत्याची पार्श्वभूमी कळल्यानंतर त्यांना ‘पीएफआय’कडून सातत्यपूर्ण धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांनी पत्नी आणि एका मुलाला परदेशात पाठवले, तर दुसऱ्या मुलालाही परदेशात पाठवण्याची तयारी सुरू केली. परंतु, तो कार्यरत असलेल्या हवाई वाहतूक कंपनीतील वहाबी एचआरने जाणीपूर्वक अडथळे आणण्यास सुरुवात केली. या नेत्याचा मुलगा मुंबईस्थीत एका हवाई वाहतूक कंपनीत वरिष्ठ वैमानिक म्हणून कार्यरत होता. त्याला ब्रिटिश हवाई वाहतूक कंपनीकडून नोकरीची संधी आली. परंतु, कंपनीच्या करारनाम्यानुसार मुदतपूर्व नोकरी सोडण्याची परवानगी नव्हती. मुदतपूर्व नोकरी सोडायची झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सीईओ) परवानगी आणि त्याने ठरवून दिलेल्या दंडाची रक्कम भरण्याचा नियम करारनाम्यात अंतर्भूत आहे. त्यानुसार त्यांनी सीईओची परवानगी मिळवली. तसेच त्यांनी निश्चित केलेली १५ लाख रुपयांची दंडाची रक्कम भरण्याची तयारी दर्शवली.
कंपनीला ही रक्कम देण्यासाठी या वैमानिकाने बॅंकेकडून १५ लाखांचे कर्ज घेतले. त्यानंतर पैसे पाठवण्यासाठी एचआरकडे आरटीजीएसची मागणी केली. परंतु, त्याने त्यास नकार दिला. तसेच करारनाम्यानुसार जानेवारी २०२३ पर्यंत कार्यमुक्त करता येणार नाही, अशी तंबीही दिली. वास्तविक सीईओने मंजुरी दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करणे ही एचआरची जबाबदारी असते. पण या कंपनीच्या एचआरने सीईओचे निर्देश ऐकण्यासही नकार दिला. कालांतराने हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे समोर आले.
राहुल शेवाळेंमुळे घेतला मोकळा श्वास
सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे या रामजन्मभूमी समर्थक शिया मुस्लीम नेत्याने कुटुंबीयांना परदेशात पाठविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला पत्नी आणि एका मुलाला तिकडे पाठविले. दुसऱ्या मुलाला ब्रिटिश हवाई वाहतूक कंपनीत नोकरीची संधी मिळाल्यास तोही बाहेर जाईल, असे नियोजन त्यांनी केले. परंतु, आधीच्या कंपनीतील एचआरने त्याला कार्यमुक्त करण्यात जाणीवपूर्व अडथळे आणले. ही बाब राहुल शेवाळे यांच्या कानावर पडताच त्यांनी संबंधित कंपनीच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यांना धारेवर धरीत या वैमानिकाला तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या नेत्यासह त्याच्या कुटुंबीयांनी मोकळा श्वास घेतला.
Join Our WhatsApp Community