‘या’ देशात आता भारतीयांना व्हिजाशिवाय प्रवेश; मुंबईत वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत विचार

143

मध्य आशियातील प्रमुख देश असलेल्या कझाकस्थानने भारतीयांकरता व्हिसा मुक्त प्रवेश धोरण स्वीकारले असून भारतीय पर्यटकांना कझाकस्थानला १४ दिवसांपर्यंत व्हिजाशिवाय भेट देता येणार असल्याचे कझाकस्थान गणराज्याचे भारतातील राजदूत नूरलान झालगसबायेव्ह यांनी सांगितले. कझाकस्थान मुंबई येथे आपले स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत देखील विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. कझाकस्थानच्या राजदूतांनी मंगळवारी (दि. ४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

भारत – कझाकस्थान राजनैयिक संबंध प्रस्थापित होण्यास ३० वर्षे झाली असून येत्या जानेवारी महिन्यात कझाकस्थानचे राष्ट्राध्यक्ष कासिम जोमर्त टोकाएव्ह भारत भेटीवर येणार आहेत. शांघाय सहकार्य संस्थेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून संस्थेची पुढील शिखर परिषद भारतात होणार आहे. या बैठकीच्या वेळी कझाकस्थानच्या अध्यक्षांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्राला देखील भेट द्यावी तसेच त्यावेळी मुंबई येथे कझाक – भारत द्विपक्षीय व्यापार परिषद व्हावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे राजदूतांनी सांगितले.

कझाकस्थान हा युरेनियम संपन्न देश आकाराने भारता इतकाच मोठा आहे. मात्र तेथील लोकसंख्या मुंबईपेक्षादेखील कमी आहे. भारत – कझाकस्थान हवाई अंतर केवळ चार तास इतके असून भारतीय पर्यटक, तसेच चित्रपट निर्मात्यांसाठी चित्रीकरणाच्यादृष्टीने, आपला देश आकर्षक असल्याचे राजदूतांनी सांगितले. कझाक लोकांना हिंदी चित्रपट फार आवडतात व तेथील किमान दोन वाहिन्यांवर दररोज हिंदी चित्रपट दाखवले जातात असे राजदूतांनी सांगितले. राजधानी अल्माटी व मुंबई थेट विमान सेवा सुरु होणार असून त्यामुळे अनेक कझाक पर्यटक भारतात येतील व मुंबई येथून पर्यटकांना कझाकस्थानला जाता येईल असे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा: मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही! उद्धव गटाच्या मेळाव्यावरील बॅनर )

अलीकडच्या काळात मुंबई येथून कझाकस्थानला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या तिपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले. कझाकस्थानचे प्रसिद्ध विचारवंत व कवी अबय यांचे नाव मुंबईतील एखाद्या चौकाला अथवा मार्गिकेला देण्याबाबत विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. भारत कझाकस्थान राजनैतिक संबंध जरी ३० वर्षे जुने असले तरीदेखील उभय देशांमधील सांस्कृतिक व व्यापार संबंध शेकडो वर्षे जुने व विश्वासाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. कझाकस्थानच्या राष्ट्राध्यक्षांचे मुंबई येथे स्वागत करण्यास आपणांस नक्कीच आनंद होईल असे राज्यपालांनी सांगितले. कझाकस्थान – भारत व्यापार व सांस्कृतिक संबंध दृढ व्हावे यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन राज्यपालांनी राजदूतांना दिले. बैठकीला कझाकस्थान गणराज्याचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत महेंद्र कुमार सांघी आणि वरिष्ठ अधिकारी आसिफ नवरोज उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.