शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजीपार्क येथे आयोजित असला तरी शिवसेना शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यात खऱ्या अर्थाने शिवसेनेचे मूळ गीतच ऐकवले गेले. विशेष म्हणजे शिवसेनेवरील गाणे ज्याने गायले ते अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर तसेच मागील दसरा मेळाव्यात ज्यांनी गीत गायनाचे कार्यक्रम केले ते नंदेश उमपही शिवसेनेच्या मेळाव्यात उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या गायक, कलावंतानांही शिंदे गटाने पळवले की काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
खरी शिवसेना कुणाची यावरून उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद चालू असून दोन्ही शिवसेना गटांमध्ये आता जोरदार चढाओढ सुरु आहे. दोन्ही गटांकडून शिवसेना दसरा मेळाव्याचे आयोजन होत असतानाच शिंदे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्यात सर्वांचे पाय शिवसेनेच्या गीतावर थिरकले. या गाण्याचे मूळ गायक असलेल्या अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांनीच हे गाणे सादर केले. त्याआधी शिवसैनिकांचे मनोरंजन करण्यासाठी नंदेश उमप यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी शिवसेनेकडे होते. परंतु ही मंडळी उध्दव ठाकरे यांच्या व्यासपीठावर दिसली नाहीत तर ती मंडळी दिसली शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर.
( हेही वाचा: मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही! उद्धव गटाच्या मेळाव्यावरील बॅनर )
शिवसेनेचे गाणे हे अवधूत गुप्ते यांनी रचले होते आणि गायलेही होते. तसेच आजवरच्या सर्व दसरा मेळाव्यात नंदेश उमप यांचाच संगीत कार्यक्रम असायचा. पण तेही उध्दव ठाकरे यांच्या गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात न जाता शिवसेना शिंदे गटाच्या बीकेसीतील व्यासपीठावर दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.