मतदारांनी शिवसेना-भाजपाला बहुमताचा कौल दिला असतानाही, त्यांच्या मतांशी गद्दारी करून आधी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री गायब झाला, तो थेट अडीच वर्षांनीच दिसला, असा सणसणीत टोला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
बिकेसी मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. बापू म्हणाले, उद्धव ठाकरेंना फोन करा आणि सांगा फक्त दोन मिनटे इकडे येऊन बघा. इथे भगवे वादळ अवतरले आहे. याला तुम्ही गद्दारी म्हणत असाल, पण हा खरा शिवसैनिक आहे. जो बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असाच आहे. आमच्यावर गद्दार असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. पण, शिवसेना-भाजपाला मतदारांनी कौल दिला असताना, त्याला झुगारून गद्दारी कोणी केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मतदारांच्या कौलाशी गद्दारी करून तुम्ही गेला कोणाबरोबर, कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत. बाळासाहेब ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला नेहमी विरोध करायचे. शरद पवारांना मैद्याचे पोते, बारामतीचा मोहंमद, दाऊदचा हस्तक म्हणायचे. विलायती सोनिया गांधी चालणार नाही, असे त्यांनी परखडपणे सांगितले होते. असे असताना बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून तुम्ही गांधी आणि पवारांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि आम्हाला गद्दार म्हणता, असेही बापू म्हणाले.
उकिरड्यावर फेकून दिले
मेलेल्या कुत्र्याला जसे फरफटून उकिरड्यावर फेकतात, तसे तुम्ही आम्हाला कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे फेकून दिले. पण शिंदे यांनी वेळीच सावध होत योग्य मार्गाची निवड केली. ही गद्दारी नव्हे, तुम्ही केलेल्या चुकीची दुरुस्ती आहे. आज शिंदेंसोबत तळागाळातला कार्यकर्ता उभा आहे. एकनाथ शिंदे सामान्यांच्या वेदना जाणतात, म्हणून ते आमचे आहेत. आमची पोरं एकमेकांची डोकी फोडणार आणि हे मातोश्रीत पोहे खात बसणार, याला नेतृत्त्व म्हणतात का, असा प्रश्न शहाजी पाटील यांनी उपस्थित केला.
शिंदेंनी दिले आयुर्वेदिक औषध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीच्या डोंगरातून आयुर्वेदिक औषध आणले आणि सगळ्या आमदारांना दिले. त्यामुळे आम्ही सगळे दिवसरात्र काम करत आहोत. बाळासाहेबांनी दिलेल्या भगव्या झेंड्यांची शान राखण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
डायलॉगची भुरळ कायम
गुवाहाटीत असताना व्हायरल झालेल्या शहाजी बापूंच्या डायलॉगची भुरळ आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. बापूंचे भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना डायलॉग म्हणून दाखवण्याची विनंती केली. त्यावर बापू म्हणाले. काय ते बिकेसी ग्राऊंड, काय ती गर्दी, काय ते भगवे वातावरण, काय ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यायला आलेले शिवसैनिक, सगळं कस्सं ओक्केमधी हाय..!