शिवसेना-भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमत दिले असतानाही, त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि वर शिवसेना संपवल्याचा आरोप आमच्यावर करतात. पण, शिवसेना आम्ही नव्हे, त्यांनीच संपवली, असा घणाघात शिंदे गटातील नेते तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.
शिंदे गटाच्या बीकेसीतील मेळाव्यात बोलताना गुलाबराव म्हणाले, त्यांच्याकडे निवडून येणाऱ्यांना किंमत नव्हती. मागच्या दाराने येणाऱ्यांना ते जवळ करायचे. आता निवडून येणाऱ्यांनी साथ सोडल्यावर कुठे गेले तुमचे संजय राऊत? ‘चक्की पिसिंग, पिसिंग’. इडीच्या भीतीने आम्ही बाहेर पडल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. ८०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या गुलाबराव पाटलाला ईडीची काय भीती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते सांगतात शिवसेनेच्या चिन्हामुळे हे सगळे निवडून आलेले आहेत. पुढच्या निवडणुकीत त्यांना धूळ चारू. ही सत्यस्थिती असेल, तर १५६ जागा लढवूनही फक्त ५६ जागा का निवडून येतात, याचा विचार कधी केला आहे का? निवडून येण्यासाठी चेहराही महत्त्वाचा असतो. त्यांच्याकडे निवडून येणाऱ्यांना किंमत नव्हती, मागच्या दाराने येणाऱ्यांना किंमत होती. त्यामुळे शिवसेना आम्ही संपवली नाही, तुम्ही संपवली, याचा विचार करा, असेही गुलाबराव म्हणाले.
( हेही वाचा: ‘माझा बाप चोरला’ म्हणणारे जगातील एकमेव उदाहरण, राहुल शेवाळेंचा हल्लाबोल )
७ तारीख अभी बाकी है
हात दाखवा आणि गाडी थांबवा, असा आपला मुख्यमंत्री आहे. ते पाच सहा वाजेपर्यंत काम करतात. शिवसैनिकांसाठी रात्रंदिवस उभा राहणारा हा मुख्यमंत्री, मातोश्रीवर बसून दिल्लीच्या गोष्टी सांगणारा नव्हे. नुकताच अलिबाबा चाळीस चोर नावाचा चित्रपट पाहिला. त्यात त्यांनी धनाची चोरी केली होती. पण, आम्ही चोरी केली ती हिंदुत्त्वाच्या भगव्याची. ग्रामपंचायतीचा एक सदस्य फोडताना भल्याभल्यांना घाम फुटतो. पण यांनी चाळीस आमदार, १२ खासदार फोडले. जगातली ही पहिलीच घटना असावी. प्राण गेला तरी बेहत्तर पण तत्वांशी तडजोड करणार नाही, या भूमिकेतून आम्ही त्यांना समर्थन दिले. आज आमच्याकडे ४० आमदार, १२ खासदार आहेत. पण, ७ तारीख अजून बाकी आहे. त्या दिवशी टांगा पलटी, घोडे फरार होतील, असे सूतोवाचही पाटील यांनी केले.
Join Our WhatsApp Community