दादर- शिवाजीपार्क, प्रभादेवी आदी परिसराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. शिवसेना भवनसमोरच या जलवाहिनीला गळती आढळून आली. त्यामुळे दुपारी तातडीने जलअभियंता विभागाच्यावतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, हे काम सुरु असले तरी विभागातील पाणी पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे महापालिकेच्या जलअभियंता विभागाने स्पष्ट केले.
(हेही वाचा – बाळासाहेब नक्की कुणाला प्रिय? उध्दव ठाकरे की एकनाथ शिंदे! रिकाम्या खुर्चीवरून शिवसैनिकांनाच पडलेला प्रश्न)
गुरुवारी दुपारी शिवसेना भवनसमोरील चौकांमध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिकेच्या जी उत्तर विभागातील जलअभियंता विभागाने तातडीने या कामाची पाहणी केली. यावेळी रस्त्याखालून जाणाऱ्या ५७ इंच व्यासाच्या जलवाहिनीमधून मोठ्याप्रमाणात गळती लागल्याचे आढळून आले. त्यामुळे युध्द पातळीवर हे काम हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी रस्ता खोदकाम करुन जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम सुरु असून रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे जी उत्तर विभागातील जलअभियंता विभागातील सहायक अभियंता कैलास धोंगडे यांनी सांगितले.
मात्र, हे काम सुरु असले तरी पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला नसून पाणी पुरवठा सुरु ठेवूनच हे काम केले जात आहे. त्यामुळे विभागातील पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community