ठाकरेंचे तिसरे युवराज राजकारणात… होणार युवासेनेचे अध्यक्ष?

181

ठाकरे कुटुंबातील आणखी एका युवराजाने राजकारणात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे राजकारणात प्रवेश करणार अशाप्रकारची जोरदार चर्चा असतानाच आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या नंतर बाळासाहेबांच्या आणखी एका नातवाने राजकारणात प्रवेश केला. आदित्य आणि अमित यांच्याप्रमाणेच आजोबांकडून राजकारणाचे बाळकडू प्यायलेले हे युवराज आतापर्यंत राजकारणापासून दूर असले तरी तेजसपूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

(हेही वाचा – बाळासाहेब नक्की कुणाला प्रिय? उध्दव ठाकरे की एकनाथ शिंदे! रिकाम्या खुर्चीवरून शिवसैनिकांनाच पडलेला प्रश्न)

ठाकरे कुटुंबातील सदस्य असलेले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नातू असलेले युवराज म्हणजे निहार बिंदू माधव ठाकरे. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निहार यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते चर्चेत आहे. पण त्यानंतर मूळ शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाचे यावरून जो सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद केला जात आहे, त्या कायदेतज्ज्ञांच्या टिममध्येही निहार ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यामुळे कालपर्यंत मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट आणि त्यानंतर वकीली पेशामध्ये दिसणारे निहार ठाकरे हे बुधवारी बीकेसीमध्ये झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील व्यासपीठावर दिसले. त्यांच्यासोबत स्मिता ठाकरे याही होत्या.

विशेष म्हणजे शिवसेना ही ठाकरेंची असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात उध्दव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांनीही शिंदे यांना व्यासपीठावर हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचेही शिवसेना शिंदे गटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देत प्रवेश दिला गेला. एवढेच नाही तर निहार ठाकरे यांना मुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आपल्या डाव्या बाजुच्या पहिल्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला, तर स्मिता ठाकरे यांनाही पहिल्या रांगते बसण्याचा मान दिला.

निहार ठाकरे हे शिंदे गटाच्या व्यासपीठावर जाहीरपणे येत एकप्रकारे राजकारणातच प्रवेश केलेला असून आदित्य उध्दव ठाकरे, अमित राज ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबातील तिसरे युवराज हे राजकारणात प्रवेश करणारे ठरत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्यावतीने युवा सेनेची जबाबदारी निहार ठाकरे यांच्याकडे देण्याची दाट शक्यता आहे. मूळ युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे असून सरचिटणीस वरुण सरदेसाई हे आहेत. तर भविष्यात उध्दव ठाकरेंची दुसरे पुत्र तेजस हे राजकारणात प्रवेश करणार असून त्यांच्यावर युवा सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून आदित्य ठाकरे यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या युवा सेनेचे अध्यक्षपद निहार ठाकरे यांच्याकडे गेल्यास युवा सेना अध्यक्षपद ठाकरे घराण्यात राहणार आहे. त्यामुळे चांगला संदेश जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे निहार ठाकरे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जावई असून आजवर राजकारणापासून लांब राहणाऱ्या निहारला सासरेबापूंकडून राजकारणाबाबत मार्गदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र बिंदू माधव ठाकरे यांचे निहार हे पुत्र असून उध्दव ठाकरेंचे सख्खे पुतणे आहेत, तर राज ठाकरे यांचे चुलत पुतणे आहेत. बिंदू माधव हे हॉटेल व्यावसायात होते आणि चित्रपट निर्मितीत त्यांनी पाऊल ठेवले होते. त्यांचा पहिलाच चित्रपट हिट गेला गेला. परंतु त्यांचे अपघाती निधन झाल्यानंतर हे कुटुंब थोडे राजकारणापासून लांबच होते. उध्दव ठाकरे यांनीही कधी भावाच्या मुलाला राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे शिंदे गटात प्रवेश करत एकप्रकारे राजकीय जीवनाची सुरुवात निहारने करायला निर्धार केला असावा असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.