कोविडबाबत आजही सजग आणि जागृत राहणे गरजेचे – डॉ. संजय ओक

116

कोविडचा धोका संपला असल्याचे अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले नाही. त्यामुळे याबाबत सजग व जागृत राहणे गरजेचे असल्याचे राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. ओक यांनी गुरुवारी ‘मुंबई प्रेस क्लब’ येथे ‘मुंबई फाइट्स बॅक’ या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रादरम्यान स्पष्ट केले.

मुंबई प्रेस क्लबमधील या मुंबई फाईट्स बॅक या पुस्तकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चर्चेत बोलतांना डॉ. संजय ओक यांनी, ‘मुंबई फाइट्स बॅक’ असे अतिशय समर्पक नाव असणा-या पुस्तकात नावाप्रमाणेच ‘मुंबईचा कोविड विरोधातील लढा’ हा अतिशय अर्थवाही शब्दात आणि समर्थपणे मांडण्यात आला आहे.‌

oak 1

कोविड लढा समजून घेण्यासाठी पुस्तक दिशादर्शक

मुंबईच्या कोविड विरोधातील लढ्यात सहभागी झालेल्या विविध बाबींची आणि उपाययोजनांची  नोंद घेणारे हे पुस्तक हा लढा समजावून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त असून भविष्यात वैद्यकीय सेवा सुविधांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनेही हे पुस्तक दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि ‘कोविड टास्क फोर्स’ चे सदस्य डॉ. राहुल पंडित; ‘मुंबई फाइट्स बॅक’ या पुस्तकाचे लेखक व मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि पुस्तकाच्या सहलेखिका सुमित्रा देबरॉय या उपस्थित होत्या. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर या चर्चासत्राला आवर्जून उपस्थित होते.

(हेही वाचा मोदींकडून शिंदे गटाला दसरा गिफ्ट; केंद्रात दिली मोठी जबाबदारी)

मुंबई या विषाणूचा मुकाबला करण्याचे मोठे होते आव्हान

यावेळी बोलतांना महाराष्ट्र राज्याच्या ‘कोविड टास्क फोर्स’चे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी, मुंबईसारख्या लोकसंख्या अधिक असलेल्या व अनेक भागात दाटीवाटीची वस्ती असलेल्या महानगरात कोविड विषाणूचा मुकाबला करणे, हे अत्यंत मोठे आव्हान होते.

पोस्ट कोविड कॉमप्लिकेशन्सचा सविस्तर अभ्यास होण्याची गरज

मात्र, मुंबई महानगरपालिकेने आपल्या आरोग्य व वैद्यकीय यंत्रणेने दिवस रात्र एक करून केलेली कामे आणि त्याच सोबत खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय यंत्रणेने सार्वजनिक क्षेत्रासोबत सुसमन्वय साधून केलेली बहुविध कामे यामुळे मुंबईचा कोविड विरोधातील लढा हा यशस्वी झाला असल्याचे डॉ. पंडित यांनी सांगितले. त्याचबरोबर ज्यांना कोविड होऊन गेला आहे,  त्यांच्याबाबत ‘पोस्ट कोविड कॉमप्लिकेशन्स’चा सविस्तर अभ्यास होण्याची गरज असल्याचे डॉ. पंडित यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.

वैद्यकीय सेवा सुविधांबाबत सुसमन्वयाची गरज

तर  महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त  व लेखक सुरेश काकाणी यांनी याप्रसंगी आरोग्य वैद्यकीय सेवा सुविधांच्या अंमलबजावणी करिता करण्यात आलेल्या प्रशासकीय सुव्यवस्थापनाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच प्राथमिक स्तरीय, द्वितीय स्तरीय आणि तृतीय स्तरीय वैद्यकीय सेवा सुविधांबाबत सातत्याने अधिकाधिक सुसमन्वय साधणे गरजेचे असल्याचेही सांगितले.

कोविडची सोप्या भाषेतील नोंद म्हणजे मुंबई फाइट्स बॅक हे पुस्तक

कोविड काळात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत असताना आरोग्य आणि वैद्यकीय विषयक विविध विभागांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. याच दरम्यान मुंबईमध्ये कोविड या साथरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात उद्भवला होता. या रोगाविरोधातील लढाईची अतिशय साध्या-सोप्या व ओघवत्या भाषेत घेण्यात आलेली नोंद ही  ‘मुंबई फाइट्स बॅक’ या  पुस्तकात आहे.

कोविडमध्ये काय होते महापालिकेसमोरील अडथळे

कोविड विरोधातील मुंबईचा लढा लढत असताना मुंबईतील आरोग्य व वैद्यकीय यंत्रणेला; विशेष करून महानगरपालिकेला आलेले अडथळे आणि त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या विविध उपायोजना यांची केवळ प्रशासकीय किंवा केवळ वैद्यकीय नव्हे; तर या लढ्याच्या विविध अंगांची नोंद या पुस्तकात घेण्यात आल्याचे या पुस्तकाच्या सह लेखिका सुमित्रा देबरॉय यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.