कर्जत ठरतेय शिका-यांचे ठिकाण, सलग दोन दिवस दोन कारवाया

149

कर्जत येथील साळोखवाडी येथे तीन दिवसांपूर्वी अचानक धाड टाकून वनाधिका-यांनी रानडुक्करांचे मांस विकणा-या शिका-यांना ताब्यात घेतले. ४ ऑक्टोबर रोजी वनाधिका-यांनी ही कारवाई केली. या कारवाईत रानडुक्कराचे अवयव आणि मांसाचे कोयत्याच्या साहाय्याने शिकारी तुकडे करत असतानाच वनाधिका-यांनी धाड टाकली. तर दुस-या दिवशीही या प्रकरणात सामील इतर शिका-यांसह जंगलात शिकारीसाठी गेलेल्या शिका-यांच्या वाहनाचा पाठलाग करुन वनाधिका-यांच्या टीमने पकडले.

आरोपींना सहा दिवसांची वनकोठडी सुनावली

या कारवाईत वनाधिका-यांनी पकडलेल्या आरोपीनेच रानडुक्करांच्या मांसविक्री प्रकरणातील साखळी उघडकीस आणली. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे वनाधिका-यांनी कर्जत येथील डोनेवाडी या भागांत धाड टाकली. डोनेवाडी येथे रानडुक्कराच्या अवयवाची विक्री करताना रविंद्र वाघमारे या आरोपीला वनाधिका-यांनी रंगेहाथ पकडले. तपासणीअंती वनाधिका-यांना आरोपीकडे रानडुक्कराचे ३९ किलो मांस आणि अवयव तसेच ४ कोयते मिळाले. दोन दिवसांच्या सलग कारवाईत रविंद्र वाघमारेसह वनाधिका-यांच्या टीमने दशरथ वाघमारे, शरद वाघमारे, सोमनाथ पवार, दिपक पवार यांच्यासह डोनेवाडी येथेच लपलेल्या गजानन पवार या सहाव्या आरोपीला अटक केली. रानडुक्कराच्या मांसविक्री प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाने बुधवारीच त्यांना कर्जत येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

(हेही वाचा शिवसेना भवनजवळ जलवाहिनी फुटली, दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर)

शिका-यांच्या गाडीचा पाठलाग केला

एकीकडे दोन दिवस सलग कारवाया सुरु असताना बुधवारी कर्जत पूर्व भागांतील खांडस येथील जंगलात शिकारी गेल्याची माहिती वनाधिका-यांना मिळाली. जंगलाच्या दिशेने पांढ-या रंगाच्या ईको गाडीच्या सततच्या येण्याने वनाधिका-यांना संशय आला. वनाधिका-यांनी तब्बल ४ किलोमीटर गाडीचा पाठलाग करुन अखेर गाडी थांबवली. गाडीची तपासणी केली असताना ठासणीच्या दोन बंदुका वनाधिका-यांना सापडल्या. यासह प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे ४ वागूर व २८ बांबूच्या काठ्याही गाडीत दिसून आल्या. या कारवाईत वडाचीवाडी येथे राहणा-या देवानंद खांडवी, पेठारवाडी येथील रवींद्र वारगुडे, विशाल बांगारे या तीन आरोपींना वनाधिका-यांनी ताब्यात घेतले.

कारवाई पथक 

ही कारवाई अलिबाग वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे आणि पनवेल येथील सहाय्यक वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत कर्जत पूर्व विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी सहभाग घेतला. दुस-या कारवाईत खांडस येथील वनपाल काळुराम दगडू, खांडस येथील वनरक्षक प्रकाश मुंढे, चाफेवाडीतील वनरक्षक माधव केंद्रे, जामरुगं येथील वनरक्षक विठ्ठल खांदाजे यांनी सहभाग घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.