१६ वर्षीय मुलीची हत्या; चौघी जणी पोलिसांच्या नजरकैदेत

131
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गोणीत बंद करून नाल्यात फेकणाऱ्या मारेक-यांनी रात्री उशिरा ओळख पटवण्यात नेहरू नगर पोलिसांना यश आले आहे. मारेकरी चार असून चौघेही महिला असल्यामुळे त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसली तरी त्यांना पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी या चौघींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चार मारेकरी महिलांपैकी एकीच्या पतीचे मृत मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. तसेच,  ती तिच्या पतीला सोडण्यास तयार नसल्यामुळे तिची हत्या करण्यात आली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुर्ला पूर्व बंटर भवन येथील नाल्यात नेहरू नगर पोलिसांना एका गोणीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेह कुजल्यामुळे ओळख पटवता येत नव्हती. प्राथमिक तपास व परिस्थितीजन्य पुराव्यावरून नेहरू नगर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
या हत्येच्या तपासासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.  या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता एका फुटेजमध्ये पोलिसांना एका रिक्षातून दोन महिला एक गोणी बाहेर काढत असल्याचे दिसले. पोलिसांनी रिक्षा चालकाला शोधून काढत चौकशी केली असता दोन महिला चेंबूर माहुल येथून रिक्षात बसल्या होत्या, त्यांना मी कुर्ला पूर्व येथील वत्सलाताई नाईक नगर येथे सोडले अशी माहिती दिली.  तपास पथकाने माहुल गाव येथे या महिलांचा शोध घेतला असता या महिला माहुल गाव येथे सापडल्या. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली मात्र त्यांनी आम्हाला काही माहीत नसल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
अखेर त्यांची उलटतपासणी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच, या कामात आणखी दोघींनी मदत केल्याचेही सांगितले. पोलिसांनी या दोघींना कुर्ला पूर्व शेल कॉलनी येथून ताब्यात घेतले. मात्र महिला असल्यामुळे त्यांना रात्री अटक करू शकत नसल्याने त्यांना पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले असून शुक्रवारी या चौघींना अटक करण्यात येणार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे चौघींपैकी एका महिलेच्या पतीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते, तिला अनेक वेळा समज देण्यात आली मात्र ती ऐकत नसल्यामुळे या मुलीला गोड बोलून माहुल येथे आणून तिची दोघींनी गळा आवळून हत्या केली, व इतर दोघींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांना मदत केली अशी माहिती समोर आली.
महिन्याभरापूर्वी मृत मुलीने नेहरू नगर पोलीस  ठाण्यात एका ५० वर्षीय व्यक्ती विरोधात छेडछाडची तक्रार केली होती. नेहरू नगर पोलिसांनी त्या व्यक्ती विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर ही मुलगी गावी निघून गेली होती, परंतु न्यायालयात पोक्सो प्रकरणात जबाब नोंदवायचा असल्याने तिला पोलिसांनी बोलावून घेतले होते, काही दिवसांपूर्वी ती उत्तर प्रदेशातून मुंबईत आली होती. त्यानंतर ती पुन्हा आरोपी महिलेच्या पतीच्या संपर्कात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.